एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेच्या बंडखोर आमदार आणि मंत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी मंत्री उदय सामंत हे देखील शिंदे गटात सामील झाल्यामुळे आता शिवसेनेचे विधानसभेतील फक्त आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री उरले आहेत. त्यामुळे आता एकाकी असलेले आदित्य ठाकरे हे आता चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. ज्यांच्यात बंड करण्याची हिंमत आहे त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं, प्रत्येकाला पाडल्याशिवाय मी राहणार नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहे.
गाठ आमच्याशी आहे
बंडखोरांमध्ये जे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार आहेत, ते शिवसेना या नावामुळे निवडून आले आहेत. तुमच्यात बंड करण्याची हिंमत आहे, स्वतःला शिवसैनिक म्हणून म्हणवून घ्यायची हिंमत आहे तर आज राजीनामे द्या आणि समोर या. आमच्यासमोर निवडणूक लढा, प्रत्येकाला पाडल्याशिवाय मी राहणार नाही, गाठ आमच्याशी आहे, असा थेट इशारा आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
शिंदेंना बोलावलं होतं…
बंडाच्या एक महिना आधी 20 मे ला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर बोलावून घेतलं होतं. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री पदाच्या चाव्या सोपवण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दाखवली होती. त्यावेळी त्यांनी नाटक केलं. पण तरीही 20 जूनला जे व्हायचं होतं ते झालंच. तिथे गेलेले 15 ते 16 आमदार हे आमच्या संपर्कात असून त्यांना फरफटत नेल्याची माहिती ते आम्हाला देत आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
त्यांच्यासाठी महाराष्ट्राची दारं बंद
ज्यांना शिवसेनेत परत यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. पण जे चांगले आहेत, जे आपल्यातले आहेत, जे अजूनही आपल्याशी मनाने जोडले गेलेले आहेत केवळ त्यांच्याचसाठी दरवाजे खुले आहेत. जे स्वतःला विकून गेले आहेत, इतरांना विकत घेण्याचा प्रयत्न ज्यांनी केला आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचेच नाही तर महाराष्ट्राचे दरवाजेही बंद झाले आहेत, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार हल्ला चढवला आहे.
Join Our WhatsApp Community