गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तानाट्य सुरू असताना यामध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स पाठवले आहे. संजय राऊत यांना उद्या, मंगळवारी ईडीने चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत.
पत्राचाळ प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांनी ईडीसमोर केलेल्या खुलाश्यांच्या आधारे हे समन्स बजावण्यात आले आहे.
दरम्यान, आपल्याला ईडीकडून नोटीस मिळालेली नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. उद्या मंगळवारी संजय राऊत यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे राऊत उद्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे चौकशीकरता हजर राहण्यासाठी राऊत ईडीकडे मुदत मागणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.
Enforcement Directorate (ED) summons Shiv Sena MP Sanjay Raut on June 28, in connection with Patra Chawl land scam case
(File pic) pic.twitter.com/bPioKK6IPJ
— ANI (@ANI) June 27, 2022
काय आहे प्रकरण?
मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच संदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. उद्या म्हणजेच २८ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये राऊत यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ईडीने आधीच जप्त केलेत ९ फ्लॅट याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. ही संपत्ती ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’चे माजी निर्देशक प्रवीण राऊत यांच्या मालकीची पालघर, सफाळे, पडघा येथील जमिनींबरोबरच दादरमधील वर्षा राऊत (संजय राऊत यांच्या पत्नी) यांचा फ्लॅट आणि अलिबामधील किहिम समुद्रकिनाऱ्यावरील वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर (सुजित पाटकर यांच्या पत्नी) या दोघींची एकत्रित मालकी असणाऱ्या जमिनीचा समावेश आहे. अलिबागमध्ये भूखंड खरेदी केलेल्या भूखंडांची किंमत साधारणतः ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे.
Join Our WhatsApp Community