एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभु आणि गटनेते अजय चौधरी यांना नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 11 जुलै रोजी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाने हा सत्तासंघर्ष अजून लांबणीवर गेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस
एकनाथ शिंदे यांच्या गटाने अपात्रतेच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पारदीवाला यांच्या खंडपिठाकडून सुनावणी पार पडली. अपात्रतेच्या मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी आता उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभु आणि गटनेते अजय चौधरी आणि केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
बंडखोर आमदारांना मुदत वाढवून दिली
न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर तीन दिवसांच्या आत त्याचे उत्तर दाखल करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. त्यानंतर त्यावर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तसेच शिंदे गटाला आपली बाजू मांडण्यासाठी 12 जुलैपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community