मुंबईतील स्वातंत्र्याच्या खुणा जतन करण्याचा प्रयत्न आता मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केला जात आहे. या अंतर्गत ‘डी’ विभागातील आँगस्ट क्रांती मैदान व सभोवतालच्या परिसराच्या पुरातन वैशिष्टांचे जतन करण्याच्या दृष्टीकोनातून आता सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सात मार्गांच्या पदपथांचेही सुशोभिकरण केले जाणार आहे. पदपथांची सुधारणा करण्यासाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च केला जाणार असून कंत्राटदाराने काम पूर्ण केल्यानतर पुढील तीन वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पुढील तीन वर्षांकरता त्याच कंत्राटदारावर जबाबदारी सोपवून त्यावर सुमारे दोन कोटी रुपयांचे खर्च केल जाणार आहे. विशेष म्हणजे सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या पदपथांच्या कामांसाठी तीन वर्षांचा दोषदायित्व असताना महापालिकेने प्रथमच या कामांमध्ये दोष दायित्वाच्या कालावधीतील कामांसाठीही कंत्राटदाराला पैसे मोजण्याची तयारी दर्शवली आहे.
( हेही वाचा : आमदारांचे फुटणे, शिवसेनेच्या पथ्यावर )
ऑगस्ट क्रांती मैदानाचे अनन्य साधारण महत्व असून ऑगस्ट क्रांती मैदान हे गावदेवी पुरातन प्रसिमेमध्ये येत असल्याने ऑगस्ट क्रांती मैदान व परिसराचे जतन करणे आवश्यक आहे. या कामांतर्गत मैदानातील सिमेंटचा पाथ वे काढून त्याजागी मातीचा पाथ वे तयार केला जाणार आहे. त्यासाठी पावसाळी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल अशाप्रकारे पर्जन्य जलवाहिन्यांचे काम केले जाणार आहे. या मैदानातील महापालिकेच्या चौक्या हलवल्या जाणार आहेत. तर मैदानाच्या चहू बाजूला असलेल्या संरक्षण भिंती तोडून त्या ऐवजी लोखंडी ग्रील लावत लावण्याचे काम हाती घेत या कामांसाठी यापूर्वी १६कोटी रुपये खर्च केला जात असून यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामाला सुरुवात केल्यानंतर आता या रस्त्याला जोडणाऱ्या पदपथांचीही सुधारणा करत त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
या ऑगस्ट क्रांती मैदानाला ऑगस्ट क्रांती मार्ग (कॅम्पस कॉर्नर ते नाना चौक), पंडित रमाबाई मार्ग ( नाना चौक ते चौपाटीकडे जाणारा), तेजपाल रोड, कृष्णा सांधी मार्ग, काशीबाई नवरंगे मार्ग, लबूरनम रोड, वाच्छा गांधी रोड आदी रस्त्यांच्या पदपथांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. हे सिमेंट काँक्रिटीकरण करताना युटीलिटीजची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच या पदपथांचे नुतनीकरण तसेच सुशोभिकरण केल्यानंतर येथील पदपथांवर असलेल्या स्टॉल्सची मांडणीत सुसुत्रता आणली जाणार आहे. या पदपथांचे व रस्ता दुभाजकांचे काम पुर्ण झाल्यानंतर या जागेची योग्य निगा राखण्यासाठी व डागडुजी करण्यासाठी पुढील तीन वर्षांच देखभालीचे कंत्राट अशाप्रकारे महापालिकेने निविदा मागवत कंत्राटदाराची निवड केली आहे.
या कामांसाठी ब्यूकॉन ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीला पदपथांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामासाठी सुमारे १४ कोटी व तीन वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये अशाप्रकारे एकूण १६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या सुशोभिकरणासाठी पहिल्या टप्प्यातील कामांकरता १६ कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातील कामांकरता १४ कोटी तसेच तीन वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये अशाप्रकारे एकूण ३२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. परंतु या सात रस्त्यांच्या पदपथासह रस्ता दुभाजकाच्या कामांसाठी ज्या कंत्राटदाराकडून काम करून घेतले जाणार आहे, त्या कंत्राटदाराचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देत त्यावर दोन कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे हेरिटेजच्या नावाखाली एक वेगळ्या मार्गाने लूट सुरु असून प्रशासकांचेही याकडे लक्ष दिसून येत नाही.
यासंदर्भात पुरातन वास्तू विभागाचे प्रमुख अभियंता संजय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ऑगस्ट क्रांती मैदानातील सुशोभिकरणाच्या कामांमध्येही ३ वर्षांच्या देखभालीच्या कामाचा समावेश होता, तसेच येथील सात रस्त्यांच्या पदपथांच्या तसेच रस्ता दुभाजकांच्या नुतनीकरणाच्या कामांसाठी तीन वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या पदपथावर युटीलिटीज टाकण्यासाठी कोणा कंपनी किंवा संस्थांकडून खोदकाम करायचे झाल्यास ते खोदलेले चर बुजवण्याचे काम संबंधित संस्थेकडून करून घेतले जातील,असे त्यांनी सांगितले. तसेच झेब्रा क्रॉसिंगचा रंगही याच संस्थेकडून पुन्हा रंगवून घेतले जाणार आहे. त्यामुळे पदपथाची पुढील काळात योग्य काळजी घेण्यासाठीच हे देखभालीचे वाढीव कंत्राट देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे इतिहास
८ ऑगस्ट, १९४२ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅक मैदानावर (ऑगस्ट क्रांती मैदान) येथे झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात महात्मा गांधीजींनी ब्रिटीश सत्तेला ‘चले जाव’ चा इशारा दिला ‘लढेंगे या मरेंगे’ ची घोषणा झाली व त्याच रात्री स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांना अटक झाली व ‘चले जाव’ आंदोलन पूर्ण देशभर पसरले. म्हणूनच ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक प्रेरणास्थान असून, भारताच्या पुढील पिढीला स्वातंत्र्यलढयाचा इतिहास उलगडण्यासाठी सर्व भारतीयांसाठी असलेले हे ठिकाण ऐतिहासिक दृष्टया जतन करून, स्वातंत्र्यलढयातील सैनिकांचे एक स्मारक सुशोभित करुन जतन करण्याचा महापालिकेचा उद्देश आहे.
Join Our WhatsApp Community