महाराष्ट्रामध्ये मराठा लॉबी ही सत्ताकेंद्रस्थानी आहे आणि या लॉबीचं नेतृत्व शरद पवार करतात असं त्यांच्या चाहत्यांना वाटतं. तरी देखील सामान्य मराठा माणसाला न्याय मिळाला नाही. म्हणून मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी झाली. देवेंद्र पडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण देण्याचं कबुल केलं पण उद्ध ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजाला न्याय मिळू शकला नाही, याचा राग या समाजाच्या मनात निश्चितच आहे.
( हेही वाचा : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद नकोय, शिवसेनाप्रमुखपद हवंय )
शिवसेनेने राष्ट्रवादी व कॉंग्रेससोबत संसार थाटला
शरद पवार हे मराठा समाजाचे नेते मानले जातात. लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस हे कितीही कर्तृत्ववान असले तरी ते जातीने ब्राह्मण आहेत. महाराष्ट्रात जातीचं राजकारण चालतं हे कटू सत्य आपण नाकारुन चालणार नाही. म्हणून भाजपाला एका मोठ्या मराठा नेत्याची गरज होती. ती गरज नारायण राणे यांनी पूर्ण केली. पण आपला मित्रपक्ष शिवसेनेने आपली साथ सोडली आणि त्यांनी राष्ट्रवादी व कॉंग्रेससोबत संसार थाटला, ही खंत भाजपाच्या मनात होतीच.
आता जर महाराष्ट्रात किमान दोन-तीन टर्म भाजपाची निर्विवाद सत्ता आणायची असेल तर सरकार पाडण्याची घाई करुन चालणार नाही, त्यात कोरोनाचं संकट देखील आलम. भाजपाने वेट-ऍंड वॉच या तत्वाचं अनुकरण केलं. देवेंद्र फडणवीस सतत म्हणत होते की हे सरकार आपापसातल्या भांडणामुळेच कोसळेल, आम्ही सरकार पाडणार नाही. आता ही भविष्यवाणी खरी करुन दाखवायची असेल तर शिषूपालाला चुका करु देणं हे गरजेचं होतं.
शिषूपालाची कुवत नसतानाही जरासंधाने त्याला पूर्ण बळ द्यावं आणि मग शिषूपाल बेताप वागावा असंच संजय राऊतांचं आणि एकंदर महाविकासआघाडीचं झालं होतं हे आपण पाहिलेलं आहे. मग केवळ हे सरकार पाडून चालणार नाही, विरोधक पुन्हा सत्तेत बसणार नाही याची काळजी व्यवस्थित घेतली गेली आहे. हे सरकार शरद पवारांच्या आशीर्वादाने निर्माण झालेलं आहे आणि शिवसेनेने भाजपाला दगा देऊन निर्माण झालेलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांवर अन्याय होणार आणि त्यांच्यात फुट पडणार हे स्वाभाविक होतं.
तेव्हाच ठाकरेंचं राजकीय अस्तित्व कमकुवत झालं
विरोधक असे आरोप करत आहेत की या बंडाला भाजपाचा पाठिंबा आहे. आपण विरोधकांचा आदेश शिरोधार्ह मानून त्या दृष्टीने विचार करुया. जर शिंदेंना बंड करायचं असेल तर ते त्यांनी स्वतःच्या बळावर केलं असतं. इतकी क्षमता त्यांच्या मध्ये आहेच. मग यात भाजपाल का उडी घ्यावीशी वाटली? केवळ सरकार पाडण्यासाठी? नाही. मुळीच नाही. एकनाथ शिंदे हे मराठा आहेत आणि म्हणूनच भाजपाला या बंडामध्ये रस आहे. मराठा समाज आता पवारांच्या मागे उभा राहणार नाही. मराठा समाज राणे आणि एकनाथ शिंदे यांच्याच मागे उभा राहणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
या राजकारणात आपल्याला ठाकरे दिसत असले तरी ते केवळ लोणच्यापुरते आहेत. शिवसेनेतील बंड हे एका मराठा नेत्याने केलं तेव्हाच ठाकरेंचं राजकीय अस्तित्व कमकुवत झालेलं आहे. ज्या मराठा समाजाला भाजपासोबत किंवा राणेंसोबत यायचं नाही, त्यांच्यासाठी शिंदे हा चांगला पर्याय आहे. राजकारणात जे घडतं, त्याच्या मधल्या ओळी जर आपण वाचल्या तर आपल्याला कोडं नक्कीच उलगडेल. राणेंच्या मदतीने मराठा लॉबीला आपल्याकडे वळवण्यात आणि शिंदेंच्या माध्यमातून आपल्या विरोधकांकडून ही लॉबी काढून घेण्यात भाजपाला यश मिळालेलं आहे असं म्हणावं लागेल.
Join Our WhatsApp Community