मुंबई महापालिकेने खासगी वाहनांना व्हॅले पार्किंगचा मार्ग खुला केला असतानाच आता बेस्ट उपक्रमाने सुद्धा यात सहभाग घेण्याचे ठरवले आहे. बेस्टने संपूर्ण मुंबईतील आगारांमध्ये खासगी वाहनांना व्हॅले पार्किंग सुविधा देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मोबाइल अॅपचा वापर करण्यात येणार आहे. या अॅपच्या आधारे वाहनचालकांना पार्किंगच्या शुल्काची रक्कम ऑनलाइन भरता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवास होईल भरभर! होणार ‘हे’ महत्वाचे बदल)
अॅपद्वारे माहिती
बेस्ट उपक्रमाने उत्पन्न वाढवण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करण्याचे ठरवले आहे याअंतर्गत खासगी वाहनांना आगारांमध्ये पार्किंगची सुविधा देण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी केली जात असून यासाठी मोबाइल अॅपची मदत घेता येणार आहे. या अॅपवर तुम्ही बेस्ट आगारांमध्ये पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे का ते तपासू शकता. पार्किंगची जागा, शुल्क याची सविस्तर माहिती ग्राहकांना अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बेस्ट काही वर्षांपूर्वी बेस्ट आगारात खासगी गाड्यांना पार्किंगसाठी जागा देताना शुल्क निश्चित केले होते परंतु याचे दर अधिक असल्याने काही दिवसांनी बेस्ट समिती सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतल्याने हे दर कमी करण्यात आले.
असे असणार दर
खासगी वाहने बेस्ट आगारात पार्क करण्यासाठी दुचाकीसाठी १२ तासांसाठी ७५ रुपये तर चारचाकी वाहनांसाठी १५० रुपये दर निश्चित केले होते. हे दर आता अनुक्रमे ३० रुपये आणि ७० रुपये करण्यात आले आहेत. ही योजना पुन्हा सुरू करताना अॅपबरोबरच प्रत्यक्ष आगारात वाहनांच्या पार्किंगसाठी कर्मचारी नेमले जातील असे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बेस्टच्या उपक्रमाकडे २७ आगार असून त्यात नेमकी किती वाहने पार्क करता येतील याची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल. या आवारात टॅक्सी, रिक्षा अशी खासगी वाहने सुद्धा पार्क करता येतील.
Join Our WhatsApp Community