जाचक ड्युट्यांचे शेड्युल, चुकीचे काम वाटप अधिकाऱ्यांची मनमानी, तसेच ज्येष्ठ कामगारांचा विचार न करता रुट जॉईन करून डुट्या वाढवणे यांसदर्भात गेल्या काही दिवसांपासून बेस्ट कामगांरामध्ये प्रचंड असंतोष होता. म्हणूनच २७ जून रोजी यासंदर्भात बेस्ट कामगार संघटनेने बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेशचंद्रा व रविंद्र शेट्टी यांची भेट घेतली. यानंतर कामगारांचा असंतोष दूर करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
( हेही वाचा : बेस्ट कामगार आक्रमक; ड्युटी शेड्युलमध्ये बदल न झाल्यास बहिष्कारावर ठाम)
नव्याने ड्युटी शेड्युल
बेस्ट कामगार संघटनांनी ड्युटी शेड्युलमध्ये बदल न केल्यास १ जुलैपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे नियोजित ड्युटी शेड्युल रद्द करून नव्याने हे बेस्ट कामगारांचे शेड्युल लावण्यात येणार आहे. यानंतर सेवा ज्येष्ठतेचा विचार करून ड्युट्या अलॉट करता येतील अशा सूचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. असे बेस्ट कामगार संघटनेने स्पष्ट केले आहे. एकतर्फी ड्युटी अलॉट केल्यामुळे वरिष्ठ कामगारांवर प्रशासनाने अन्याय होत होता, तसेच बरेचसे कामगार लांब राहत असल्यामुळे व ड्युटी संपल्यानंतर घरी गेल्यामुळे त्यांना ड्युटी फॉर्म भरता आले नाहीत. त्यामुळे प्रथम सर्व फॉर्म भरून घ्यावेत आणि त्यानंतरच सोयीनुसार ड्युटी वाटप करण्यात यावे. म्हणजे कोणावर अन्याय होणार नाही अशी भूमिका भाजप सरचिटणीस गजानन नागे यांनी प्रशासनाला सांगितली.
कामगार संघटनेने दिला होता इशारा
प्रशासन या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत असून जर प्रशासनाने ड्युटी फॉर्म भरल्यानंतर ड्युट्या वाटप केल्या नाहीत तर भाजप बेस्ट कामगार संघातर्फे तसेच अन्य युनियन तर्फे सर्व आगारामध्ये आंदोलन करण्यात येईल, कोणीही कामगार ड्युटीवर जाणार नाही. असा इशारा भाजप कामगार संघातर्फे देण्यात आला होता. कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नव्याने सुधारणा करत ड्युट्या लावल्या जातील अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. असे नागे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community