प्रारुप मतदार यादीतील हरकती आणि सूचनांसाठी दोन दिवसांची मुदतवाढ

154

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती नोंदवण्यासाठी दोन दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. ही मुदत ३ जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत १ जुलै २०२२पर्यंत देण्यात आली होती.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिका, त्यांचे संकेतस्थळ आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती; परंतु ही मुदत आता ३जुलै २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी रविवार व शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीही आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : पदवीधर लिपिकांना मिळणार नाही अतिरिक्त वेतनवाढ)

ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील हरकती व सूचना

महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील हरकती व सूचना दाखल करता येतील. ट्रू- व्होटर मोबाईल ॲप ‘प्ले स्टोअर’वरून आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करता येईल. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करता येईल. ‘व्होटर लीस्ट’ सर्च या मेनूवर क्लिक केल्यावर आपले नाव व मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू शकेल. त्यासंदर्भातील हरकतीसाठी ‘व्होटर लीस्ट ऑबजेक्शन’ यावर क्लिक करून ‘व्होटर लीस्ट इलेक्शन प्रोग्राम २०२२’ निवडून पुढे योग्य त्या पर्यायावर जाऊन आपली हरकत नोंदविता येईल.

अंतिम मतदार याद्या ९ जुलै २०२२ रोजीच प्रसिद्ध होणार 

विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलै २०२२ रोजीच प्रसिद्ध करण्यात येतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.