भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींचा आदेश असतो तो पाळावा लागतो. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी लागली. हे मोठे उदाहरण. मुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, असे असताना त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. परंतू फडणवीसांचा चेहरा काही वेगळेच सांगत होता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. आरएसएसच्या संस्कारांमुळे त्यांनी हे पद स्वीकारले, असे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फडणवीसांची स्वीकृती मला आश्चर्याची वाटली नाही
सत्ता आली की मिळेल ती संधी स्वीकारायची असते हे फडणवीसांनी दाखवून दिले. शंकरराव चव्हाण अर्थमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा शंकरराव माझ्या मंत्रिमंडळात आले. अशोकराव चव्हाण देखील मुख्यमंत्री होते, त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अशी उदाहरणे महाराष्ट्रात घडलेली आहेत. यामुळे फडणवीसांची स्वीकृती मला आश्चर्याची वाटली नाही, असे शरद पवार म्हणाले. शिंदे जे मुख्यमंत्री झाले, ते ठाण्याचे आहेत. अनेक वर्षे त्यांचे ठाण्यात काम आहे. परंतू ते मुळचे सातारचे आहेत. यशवंतराव चव्हाण हे सातारचे होते. मी मुख्यमंत्री झालो, मी देखील सातारचाच आहे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे सातारचेच होते, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच शिवसेनेचे नेते नॉट रिचेबल!)
साताऱ्याला लॉटरी
एकनाथ शिंदे हे ठाण्याचे प्रतिनिधी असले तरी ते मूळचे साताऱ्याचे आहेत, ही सातारा जिल्ह्याला लागलेली लॉटरी आहे. एकनाथ शिंदेंनी सेनेच्या आमदारांना प्रभावित केले, जवळपास 40 आमदार बाहेर नेले, हेच त्यांचे मोठे यश आहे. आमदारांना बाहेर नेणे हे प्लॅनिंग आधीपासूनच होते, ते काही एका दिवसात होणे शक्य नाही. शिवसेनेत या आधीही बंड झाले आहे, पण सर्व बंडखोर पराभूत झाले हा इतिहास आहे असेही शरद पवार म्हणाले. शिवसेनेत बंड झाले हे काही पहिल्यांदाच झाले नाही, जे लोक शिवसेनेतून बाहेर गेले, ते नंतर पराभूत झाले. छगन भुजबळ आणि नारायण राणे हे पराभूत झाले. माझ्या नेतृत्वाखाली निव़डणूक झाल्यानंतर 67 आमदार निवडून आले होते. मी काही दिवसांसाठी राज्याच्या बाहेर गेलो आणि सगळे सोडून गेले, फक्त सहा आमदार माझ्यासोबत राहिले. मग नंतरच्या निवडणुकीत सोडून गेलेले जवळपास सर्वजण पराभूत झाले. उद्धव ठाकरे हे सत्तेला चिकटून राहिले नाहीत हे योग्य झाले, असेही पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community