महेश सिंह
मुंबई / काशी – गंगा नदी आणि तिच्या पवित्र पाण्याचा महिमा युगानयुगे ऐकिवात आला आहे. म्हणून तिला मोक्षदायिनी, जीवनदायिनी असेही म्हणतात. आता याच गंगामातेचे पाणी चीनमधील वुहान शहरातून उद्भवलेल्या कोरोना या जागतिक महामारीवर परिणामकारक उपाय करत आहे, असा दावा बनारस हिंदू विद्यापीठाच्या वैद्यकीय विज्ञान संस्थेने केला आहे. गंगेच्या पाण्यात कोरोना विषाणूला नष्ट करण्याची शक्ती आहे, असे या संस्थेच्या संशोधनात दिसून आले आहे.
अद्याप सखोल संशोधन होणे बाकी आहे. परंतु प्राथमिक स्तरावरील संशोधनात असे दिसून आले आहे कि, गंगेच्या काठावर राहणारे लोक जे नियमितपणे गंगा नदीचे पाणी पितात, स्नान करतात त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. ते बर्याच प्रमाणात सुरक्षित आहेत.
आयएमएसच्या समितीला पाठवला अहवाल
आतापर्यंतच्या सर्व्हेची संपूर्ण माहिती आयएमएसच्या समितीला पाठविली गेली आहे. त्यावर प्रो. भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील कार्यरत १२ सदस्यांची हि समिती काय निर्णय देते याची प्रतीक्षा आहे. समितीने सकारात्मक प्रतिसाद देताच कोरोनाबाधित रुग्णांवर गंगा नदीच्या पाण्याच्या माध्यमातून उपचार केले जातील. जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यात आता बनारस हिंदू विद्यापीठाचे डॉक्टरही कोरोनावर संशोधन करीत आहेत. न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रामेश्वर चौरसिया आणि प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट प्रो. व्ही मिश्रा यांच्या टीमने आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणाविषयी सांगितले की कोरोनाच्या विषाणूला मारण्यासाठी गंगेचे पाणी प्रभावी ठरू शकते.
गंगाच्या किनाऱ्यावरील जिल्हे कोरोनापासून सुरक्षित
गंगेच्या किनारपट्टीवरील ४६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग खूपच कमी झाला असून काही लोकांना संसर्ग झाल्यास ते लवकरच बरे होत असल्याचे या टीमने म्हटले आहे.प्रा. व्ही मिश्रा म्हणाले की, गोमुखपासून गंगा सागरापर्यंतच्या शंभर ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यात प्रतिजैविक मोठ्या प्रमाणात आढळून आली. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्नासाठी त्या पाण्याचा वापर करून औषधे बनवण्यात आली आहेत.
गंगाजलाचा कोरोनावरील औषधासाठी वापर करण्याची मागणी
याआधी राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनला ‘अतुल्य गंगा’ संघटनेने लिहिलेल्या पत्रात असा दावा केला आहे की, पर्वतीय भागातील गंगा नदीत चांगल्या जीवाणूंच्या अनेक प्रजाती आढळतात, ज्यामुळे नदीचे पाणी दैवी गुणांनीयुक्त बनते. त्या जीवाणूंना शास्त्रज्ञांनी ‘निन्जा वॉरियर्स’ असे नाव दिले आहे. गंगा नदीच्या पाण्यातील हेच वैशिष्ट्ये ओळखून कोरोनावर मात करण्यासाठी या पाण्याचा वापर केला जावा, अशी मागणी केली आहे.
गंगाजल रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
गंगा नदीसंबंधी तज्ज्ञ आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अॅमिकस क्युरी अॅडव्होकेट अरुण गुप्ता यांनी दावा केला आहे कि, गंगाजल प्राशन केले तरी रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच ज्याप्रकारे अन्य विषाणू नष्ट होतात तसे कोरोनाचे विषाणूही नष्ट होतील.