गेल्या एक-दीड वर्षांपासून राज्यातील विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी रविवारी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली असून, अॅड. राहुल नार्वेकर यांना भाजपने आपला उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. दरम्यान शिवसेनेकडून राजन साळवी यांना निवडून देण्यासाठी व्हिप जारी करण्यात आला आहे.
शिवसेनेकडून व्हिप जारी
विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात रविवारी अध्यक्षपदासाठी चुरस रंगणार आहे. त्यामुळे आपले उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचाः ठाकरे सरकारचे शासन निर्णय शिंदे सरकार अडवणार?)
आगळा योग
दरम्यान ही निवडणूक केवळ औपचारिकता असून, शिंदे-भाजप गटाचे संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर यांची निवड ही जवळपास निश्चित मानली जात आहे. मुख्य म्हणजे राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यास सासरे हे विधान परिषदेचे सभापती,तर जावई हे विधानसभेचे अध्यक्ष होणार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात हा एक वेगळाच योग जुळून येऊ शकतो.
Join Our WhatsApp Community