राज्यातील विधानसभा अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना, ही निवडणूक मीच जिंकणार, असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे.
सर्व आमदार मला मतदान करतील
महाविकास आघाडीतील शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सर्व आमदार हे मला मतदान करतील आणि 160 मतांच्या पुढे मी जाईन, असा विश्वास राजन साळवी यांनी व्यक्त केला. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी राजन साळवी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचाः विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून व्हिप जारी)
अपात्र व्हायचं नसेल तर…
शिवसेना पक्षाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी आपल्या उमेदवाराला मत देण्यासाठी व्हिप जारी केला आहे. शिंदे गटातील आमदारांनाही हा व्हिप लागू होत असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. बंडखोर आमदारांना जर आमदार म्हणून अपात्र व्हायचं नसेल तर त्यांना मतदान हे मलाच करावं लागेल, असेही राजन साळवी यांनी यावेळी म्हटले आहे.
शिवसेनेकडून व्हिप जारी
विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात रविवारी अध्यक्षपदासाठी चुरस रंगणार आहे. त्यामुळे आपले उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community