मुंबईसाठी मेट्रो हा अधिकार आहे. त्यामुळे काहीही झाले तरी आरे येथे मेट्रोचे कारशेड पुढील वर्षभरात पूर्ण होईल आणि मेट्रो सुरु होईल. कारशेडसाठी आधीच झाडे कापलेली आहेत, आता एकही झाड कापण्याची आवश्यकता नाही. तरीही काही छद्म पर्यावरणवादी याला विरोध करत आहे. हे आंदोलन स्पॉन्सर्ड आंदोलन आहे. यात जे खरे पर्यावरणप्रेमी आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांचे गैरसमज दूर करू पण कारशेड आरे येथेच होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आधीच १० हजार कोटीने प्रकल्प महागला
आरे येथे कारशेड होण्यासंबंधी ग्रीन ट्रिब्युनल आणि सर्वोच्च न्यायालयानेही कारशेडच्या बाजूने आदेश दिला आहे. जर कांजूरमार्ग येथे कारशेड बांधायचे असेल तर अजून ४ वर्षे लागतील आणि ४ पटीने खर्च वाढणार आहे, त्यामुळे अधिक विलंब होऊ नये म्हणून हे कारशेड आरे येथेच बांधण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. येथील २५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. मुंबई प्रदूषणामुळे रोज होरपळत आहे. आधीच मेट्रो रखडल्याने १० हजार कोटीने प्रकल्प महागला आहे. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड होईल. आम्ही यासाठी कारशेडचा आराखडा बदलणार आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. मागील सरकारचे सरसकट निर्णय रद्द करणार नाही, जे निर्णय चांगल्या हेतूने घेतले नाहीत, तेच रद्द केले जाणार आहेत. ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटाचा अहवाल तातडीने पूर्ण करून तो सर्वोच्च न्यायालयात सादर करून तातडीने निर्णय घ्यायचा आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community