आषाढी एकादशीआधीच पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर नेमला प्रशासक 

130

राज्यात सर्वत्र वारकरी बांधवांना पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विविध दिंड्यांच्या माध्यमातून पायी चालत, विठू माऊलीच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. रविवारी, १० जुलै रोजी पंढरपूर अवघ्या भक्तीमय सागरात बुडून जाणार आहे. अशा वेळी मात्र या आषाढी एकादशीच्या आधीच पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर प्रशासक नेमण्यात आला आहे.

आषाढीपूर्वी नवीन समिती येणे अवघड

आषाढीपूर्वीच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ रविवारी, ३ जुलै रोजी संपला आहे. त्यामुळे मंदिर समिती कायद्यानुसार नवीन समिती स्थापन करेपर्यंत मंदिरावर प्रशासक सभापती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पदभार सांभाळावा लागणार आहे. मंदिर समितीच्या कायद्यानुसार नियुक्त समितीची मुदत ५ वर्षांची असते. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच वर्षांपूर्वी ही समिती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमली होती. आज ३ जुलै रोजी या समितीचा कार्यकाळ संपला, पण सध्या अजून राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात आले नसल्याने आषाढीपूर्वी नवीन समिती येणे अवघड आहे. अशा वेळी नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासक म्हणून कार्यभार सोपवण्याची तरतूद आहे. आता नवीन मुख्यमंत्र्यांना यासाठी विधी व न्याय विभागाकडून तातडीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार मंदिरावर एक अध्यक्ष आणि १२ सदस्य आहेत. यामध्ये विठ्ठलाला मानणारे एक विधानसभा सदस्य, एक विधानपरिषद सदस्य, नगराध्यक्ष, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा एक-एक सदस्य, महिला सदस्य अशी रचना आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या समितीमध्ये एक सह अध्यक्षाचे पदही निर्माण केले होते.

(हेही वाचा सुधीर मुनगंटीवारांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी! विधानसभेत तुफान फटकेबाजी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.