मुळशी तालुक्यात ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात; तिघांचा जागेवरच मृत्यू

154

पुणे मुळशी तालुक्यातील लवळेफाटा येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे. या अपघातात रेश्मा (वय २५ ) या महिलेचा व त्यांचा मुलगा रिवांश पवन पटेल (वय 6 महिने ) या बालकाचा मृत्यू झाला असून, महिलेचे पती पवन रमेश पटेल (वय ३२ वर्षे ) हे जखमी झाले आहेत, तर नांदे गावचे रहिवासी तानाजी विठ्ठल ढमाले यांचादेखील या अपघातात मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याकडून पौडच्या दिशेने फरशीने भरलेला ट्रक क्रमांक MH12KR 7706 जात असताना पिरंगुटजवळ ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, ट्रकने उताराच्या दिशेने रस्त्याने जाणाऱ्या तीन ते चार वाहनांना जोरात धडक दिली. मात्र यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, ट्रक लवळेफाटा येथे आल्यानंतर ट्रक चालकाने रस्त्याच्या डाव्या बाजूला वळवला, मात्र त्या दिशेने जात असलेली दुचाकी ट्रकच्या खाली आल्याने दुचाकीवर असलेले पवन पटेल, त्यांची पत्नी रेश्मा पवन पटेल, मुलगा रियांश पवन पटेल यांचा अपघात झाला. पवन पटेल यांची पत्नी व सहा महिन्यांचा मुलगा याचा जागीच मृत्यू झाला असून,  पवन पटेल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातच दुसऱ्या दुचाकीवर असलेले तानाजी विठ्ठल ढमाले यांचादेखील ट्रकखाली येऊन मृत्यू झाला.

( हेही वाचा: भीषण अपघात, खोल दरीत बस कोसळून शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू )

ट्रक चालक अटकेत

सुदैवाने हा ट्रक ज्या ठिकाणी उभा राहिला त्या ठिकाणी बांधकाम चालू असल्याने, वाळूचा ढिगारा होता. त्या वाळूच्या अडथळ्यामुळे हा ट्रक जागेवरच उभा राहिला आणि पुढे होणारा मोठा अनर्थ टाळला. तातडीने नागरिकांनी चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. पौड पोलीस ठाण्यात ट्रक चालक शशिकांत बाबू मांडवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.