शिंदे-भाजप युतीच्या सरकारने सोमवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावात विजय मिळवला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार प्रदर्शक भाषण केले. यावेळी त्यांनी शिवसेना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना सणसणीत टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. गुवाहटीत गेलेल्या आमदारांनी तेथील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कामाख्या देवीला बळी देण्यासाठी 40 रेडे पाठवले असल्याची टीका केली होती. त्याला आता एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उत्तर दिले आहे.
(हेही वाचाः संघर्षमय आठवणींना उजाळा देतांना मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर)
कोणाचा बळी घेतला?
मी माझ्या घरादारापेक्षा शिवसेनेला माझं कुटुंब मानलं. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांना मी माझं दैवत मानत होतो. दिवस-रात्र एक करुन जनतेसाठी काम केलं. मी असंख्य आंदोलनं करुन शिवसेना वाढवली. पण तरीही आम्हाला कोणी नाल्याची घाण, गटार अशी टीका करण्यात येत होती. कामाख्या देवीला बळी देण्यासाठी 40 रेडे पाठवले असल्याची भाषा करण्यात आली. पण कामाख्य देवीने कोणाचा बळी घेतला, हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शिंदेंची जोरदार बँटिंग
40 रेडे पाठवले पण जो बोलला तो रेडा आम्हाला नको, असे कामाख्या देवीने म्हटले, असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर विशेष अधिवेशनात त्यांनी जोरदार बँटिंग केली आहे.
Join Our WhatsApp Community