हे नवीन सरकार प्रखर हिंदुत्वावर चालावे, अशी आमची आग्रही भूमिका आहे आणि म्हणूनच मी इथे वीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आलो आहे, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आमचेही हिंदुत्व वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचेच
शिंदे गट आणि भाजपा सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे वीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मंगळवारी, ५ जुलै रोजी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे हिंदुत्व आहे, तेच आमचेही हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व म्हणजे कोणत्या इतर धर्माचा तिरस्कार करणारे नाही. परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे सरकार स्थापन झाल्यानंतर या राज्याचा विकास, हेच आमचे प्राधान्य आहे. हा विकास सर्वसामान्यांचा, सर्व घटकांना न्याय देणारा असेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
(हेही वाचा शिवसेनेच्या वेबसाईटवर एकनाथ शिंदे शिवसेना नेतेच! उपनेते पदी शिंदे गटातील आमदार कायम)
कायदा आणि सुव्यवस्था राखणे प्राधान्य
प्रत्येक घटकाला हे सरकार त्यांचे सरकार आहे, असे वाटले पाहिजे, त्यादृष्टीने हे सरकार काम करेल. कायदा आणि सुव्यवस्था राखणे याला आमचे प्राधान्य आहे. त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
वीर सावरकर स्मारकात सन्मान
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आगमन झाले, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी वीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, सहकारी स्वप्नील सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांचा गौरव केला. तेव्हा स्थानिक आमदार सदा सरवणकर हेही मुख्यमंत्र्यांसोबत होते.
Join Our WhatsApp Community