शिंदे गट-भाजप युती सरकारला सोमवारी विश्वासदर्शक ठरावात घवघवीत यश मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधान भवनात केलेल्या दिलखुलास भाषणाची देखील चांगलीच चर्चा होत आहे. पण त्यावरुनच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. विधान भवनात बोलताना रिक्षा सुसाट सुटली होती, तिला ब्रेक नव्हता, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
रिक्षा सुसाट होती
विधान भवनात एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव यशस्वी झाल्यावर भाषण केले. त्यांनी केलेल्या मनमोकळ्या भाषणामुळे विरोधकांनाही हसू आवरता आले नाही. याच भाषणावरुन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. विधान भवनात बोलताना रिक्षावाल्याची रिक्षा अगदी सुसाट सुटली होती. रिक्षाला ब्रेक नव्हता, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
(हेही वाचाः आमचे सरकार वीर सावरकरांच्या प्रखर हिंदुत्वावर चालणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका )
फडणवीस पुढे काय-काय खेचतील?
अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका कृतीवरुनही त्यांनी फडणवीस आणि शिंदेंना टोला लगावला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरील माईक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोरचा माईक खेचला, उद्या काय-काय खेचतील माहीत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
का घेतला फडणवीसांनी माईक?
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शिंदे गटात सामील झालेल्या संतोष बांगर यांच्याबाबत प्रश्न विचारला. बांगर हे नेमका कोणत्या पक्षातून आले आहेत, हे आपण सांगितलं नसल्याची विचारणा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना केली. त्यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक घेत जी खरी शिवसेना आहे त्यात बांगर सहभागी झाले असल्याचे उत्तर दिले आणि पुन्हा माईक मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला.
Join Our WhatsApp Community