पोयसर नदीच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही आसपासच्या भागातील रहिवाशांची तुंबणाऱ्या पाण्यापासून सुटका झालेली नाही. याठिकाणी चुकीच्या पध्दतीने बांधलेले पूल आणि त्या पुलाच्या कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी झोपड्यांवर हटवून रुंदीकरण केल्यानंतरही येथील लोकांना दिलासा मिळाला नसून उलट स्मशानभूमी रोडवरील गृहनिर्माण सोसायटीत नव्याने बांधलेल्या संरक्षक भिंतीवरून पाणी आत शिरले. मात्र, याबाबत प्रशासन लक्ष देत नसल्याने स्थानिक भाजप आमदार योगेश सागर यांनी बुधवारी आयुक्तांच्या घराबाहेरच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याप्रकरणी ठोस कार्यवाही न केल्यास न्यायालयात जाण्याचाही इशारा सागर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
आयुक्तांच्या घराबाहेर करणार आमदार आंदोलन
चारकोप विधानसभेचे आमदार योगेश सागर महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून हा इशारा दिला आहे. पत्रात सागर यांनी आपल्या चारकोप विधानसभा क्षेत्रातील जीवन विद्या मिशन मार्ग ( स्मशानभूमि मार्ग), डहाणूकरवाडी, कांदिवली (प.), मुंबई-६७. येथील सह. गृहनि संस्थांच्या आवारात मागील ५ वर्षांपासून पावसाळ्यात पाणी भरत असल्याची समस्या मांडली आहे. याठिकाणी पाणी साचत असल्याने रोगराई व वित्तहानी होत असून याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी तेथे पाणी जमा न होणेबाबत आपण मागील ५ वर्षांपासून पत्रव्यवहार पाठपुरावा करीत आहे. त्यासाठी सहा महानगरपालिका आयुक्त (आर/द.), महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ), मुख्य अभियंता महानगरपालिका-पूल विभाग, मुख्य अभियंता महानगरपालिका- पर्जन्य जलवाहिनी विभाग, मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी येथे वारंवार पाहणी सुद्धा केली. तरीही अद्याप याबाबत ठोस कार्यवाही झालेली नाही. तसेच आपल्याशीही अनेकवेळा पत्रव्यवहार केला काही कार्यवाही झाली नाही, त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
( हेही वाचा : NDRF आणि SDRF तैनात! अतिवृष्टीत मदत कार्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश)
महानगरपालिका प्रशासनातील घमेंडखोर अधिकारी तसेच निर्बुध्द प्रशासन तसेच तेथील पोयसर नदीवरील पूल ज्याचे आता काम पूर्ण होत आहे, त्याचे चुकीचे डिझाईन, संरक्षण भिंत या सर्व बाबींमुळे यंदाच्या पावसाळ्यातही तेथील गृहनि संस्थांमधील रहिवास्यांना हा त्रास होत आहे. या सर्व बाबी फक्त कंत्राटदारांना सांभाळून घेण्यासाठीच होत असून महानगरपालिका प्रशासनाला येथील नियमित करभरणा करीत असलेल्या रहिवास्यांबाबत काही घेणेदेणे नाही अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त केली.
यंदाच्या पावसाळ्यात बांधलेली संरक्षण भिंत ओलांडून पोयसर नदीचे पाणी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात शिरले आहे. याची गंभीर नोंद आपण घेत नसल्याने आपण उद्या सकाळी आपल्या घराबाहेर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात लक्ष घातले असून आयुक्तांनी याप्रकरणी त्वरित कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत.