सतत बरसणा-या सरींमुळे मुंबईतील तुळशी तलाव क्षेत्रात एका दिवसात ३०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. मुंबईत जवळपास सर्वच भागांत १५० ते २०० मिमी एवढाच पाऊस झाला असताना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी आणि विहार तलावात मात्र शहराच्या तुलनेत जास्त पाऊस झाला.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये तुळशी आणि विहार तलावांचा समावेश होतो. मंगळवारच्या सततच्या पावसाच्या प्रभावामुळे पवई तलाव भरुन वाहू लागला. मात्र तुळशी आणि विहार तलाव भरले नव्हते. बुधवारी सकाळी गेल्या २४ तासांत नोंदवलेल्या पावसांत तुळशी तलाव परिसरातच मुंबईतील सर्वात जास्त पाऊस झाला आहे. पावसाचा जोर बुधवारीही कायम राहणार असल्याने, या भागांत दिवसभरात 200 मिमीहून अधिक पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खासगी हवामान अभ्यासकांच्या नोंदीत बोरिवलीत मंगळवारी दुपारीच शंभर मिमीहून अधिक पाऊस झाल्याचे दिसून आले. बोरिवलीतील संजय गांधी उद्यान परिसरात मूळ प्रवेशद्वारापासून तुळशी तलावक्षेत्र १७ किलोमीटर दूर आहे. घनदाट जंगलाच्या मधोमध वसलेल्या तुळशी तलावात शहरांच्या तुलनेत तापमान कमी असते. सकाळच्या साडेआठच्या नोंदीत गेल्या २४ तासांत तुळशी तलाव परिसरात ३१३ मिमी पावसाची नोंद झाली. विहारला २१० मिमी पाऊस झाला. कोकणातील मुंबई महानगर परिसरात विरारला २३६ मिमी, वसईला २१७ मिमी पावसाची नोंद झाली. नवी मुंबईत त्या तुलनेत केवळ दोनच ठिकाणी २०० मिमी अधिक पाऊस झाला.
Join Our WhatsApp Community