वाढत्या प्रवासीसंख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डबा लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून यामध्ये आणखी २७ फेऱ्यांची भर पडणार आहे.
( हेही वाचा : इलेक्ट्रिक बस निविदा नव्याने काढण्याच्या ‘बेस्ट’ला सूचना; मात्र टाटा मोटर्स अपात्रचं!)
१५ डबा लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल धावते. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाकडून १५ डबा लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळेस चर्चगेटहून सुटणाऱ्या लोकलला दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली या स्थानकावर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी वारंवार होत होती. पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आधी ५४ फेऱ्या होत होत्या त्यानंतर फेऱ्यांची संख्या वाढून ती ७९ झाली आणि आता पुन्हा पंधरा डबा लोकलच्या २७ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय झाला असून त्याचे नियोजन सुरू आहे.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना वाढीव लोकल फेऱ्यांची प्रतीक्षा
मध्य रेल्वे मार्गावर मात्र जागेच्या कमतरतेमुळे पंधरा लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यात अडचणी येत असून मध्य रेल्वे मार्गावर लोकल फेऱ्या वाढवण्यासंदर्भात सध्या तरी विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आणखी काही दिवस लोकलच्या वाढीव फेऱ्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community