‘त्यांनी कोणाची सुपारी घेतली होती माहीत नाही?’, शिंदे गटातील आमदाराची राऊतांवर सडकून टीका

155

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह उठाव करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. या उठावाने संपू्र्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. या उठावामागे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर केलेली युती हे मुख्य कारण असलं, तरी शिवसेनेतील अंतर्गत कलह सुद्धा याला कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळेच आपल्यावर बंडखोरीची वेळ आली असल्याचे शिंदे गटातील आमदारांचे म्हणणे आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आता संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर ‘शिवतीर्था’वर राज ठाकरेंच्या भेटीला!)

राऊत तोंडाला येईल ते बोलत होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युतीबाबत विचार करण्याची संधी दिली होती. त्यामुळे शिंदेंच्या प्रस्तावाचा उद्धव ठाकरे सकारात्मक विचार करतील असे आम्हाला वाटत होते. पण दुसरीकडे आमची पदं कमी करण्यात येत होती. तसेच संजय राऊत यांची वक्तव्ये ही काळजाला घरं पाडणारी आणि चीड आणणारी होती. उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना आमच्याशी चर्चा करायला पाठवले असताना संजय राऊत मात्र तोंडाला येईल ते बोलत होते. त्यामुळे आमचं एक-एक पाऊल पुढे पडत गेल्याचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले आहे.

कोणाची सुपारी घेतली होती?

आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती करत होतो पण इथे मात्र संजय राऊत यांचा वन मॅन शो चालू होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना ज्या घडामोडी घडल्या तसं काहीतरी होईल, असं संजय राऊत यांना वाटत होतं. पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यामुळे मोडू पण वाकणार नाही या बाण्याने आम्ही चालत होतो. पण संजय राऊत यांनी कोणाची सुपारी घेतली होती ते आम्हाला काही कळत नव्हतं, अशी टीका भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर केली आहे.

(हेही वाचाः शिंदे-भाजप मंत्रिमंडळात कोणाला कोणते खाते?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.