राज्यात शिंदे सरकार विराजमान होताच पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांचे लॉबिंग सुरू झाले आहे. यापूर्वीच्या फडणवीस सरकारने ज्या अधिकाऱ्यांना जवळ केले होते, त्यांना ठाकरे सरकारने साईट पोस्टिंग देत बाजूला केले होते. परंतु आता राज्यात नव्या शिवसेना भाजपाची युती होऊन एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यावर, शिंदे व फडणवीस यांच्या जवळ असणाऱ्या अधिकाऱ्यांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात आधीच्या सरकारच्या मंत्र्यांच्या अगदी जवळ असलेल्या सनदी अधिकाऱ्यांना बाजू केल्यानंतर आपली वर्णी तेथे लागावी यासाठी काही सनदी अधिकारी स्वतः नाहीतर इतरांच्या माध्यमातून आपले नाव पुढे क्रीम पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
राज्यात २०१४ मध्ये भाजप – शिवसेना युतीचे सरकार आल्यावर राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले. फडणवीस हे मुख्यमंत्री बनताच त्यांनी आपल्या विश्वासातील काही अधिकाऱ्यांची महत्वाच्या खात्यांच्या प्रधान सचिव तथा सचिव पदी वर्णी लावून घेतली. परंतु २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर सनदी अधिकाऱ्यांमधील फडणवीस लॉबी बाजूला केली आणि आपल्या विश्वासातील अधिकाऱ्यांची वर्णी लावली. ठाकरे यांचा जास्त संबंध हा मुंबई महापालिकेशी आल्याने या महापालिकेतील आयुक्त व अतिरिक्त आयुक्त जे होऊन गेले होते, त्यांना ठाकरे सरकारने जवळ ठेवले.
परंतु आता नव्या शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आले असून, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले. आता नवीन मंत्रिमंडळ हे येत्या आठवड्याभरात स्थापन होईल आणि प्रत्येकाला खातेवाटप होईल. त्यामुळे ठाकरे सरकारने ज्यांना साईट पोस्ट करत बाजूला सारले होते, ते अधिकारी पुन्हा एकदा महत्वाच्या पदावर दिसणार आहेत. परंतु या सरकारच्या जवळ जाण्याचा काही सनदी अधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू असून यासाठी काही जण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
( हेही वाचा: ‘त्यांनी कोणाची सुपारी घेतली होती माहीत नाही?’, शिंदे गटातील आमदाराची राऊतांवर सडकून टीका )
ठाकरे सरकारच्या अगदी जवळ असलेल्या महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या नियुक्ती केंद्रीय सचिवांच्या सूचीवर झाल्याने ते लवकरच केंद्रात सचिव म्हणून जातील. परंतु अजून त्यांनी काही तशी संमती दर्शवली नव्हती. पण आता राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी आता केंद्रात किंवा अन्य ठिकाणी बदली करून जाण्याची मानसिक तयारी दर्शवली. चहल यांच्याबरोबरच अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनीही आपली या ठिकाणाहून बदली होईल याची मानसिक तयारी ठेवल्याचे बोलले जाते. नव्या शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आल्याने तसेच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनल्याने ते मेट्रो रेल्वेच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न पुढील अडीच वर्षांमध्ये करणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा एमएमआरडीएची सुत्रे देण्याची चर्चा माध्यमांनी सुरु केली आहे. अश्विनी भिडे यांच्यासारख्या हुशार आणि निर्णयक्षमता असलेल्या अतिरिक्त आयुक्तांकडे अगदी महत्वाच्या नसलेल्या खात्यांचा तसेच विभागांची जबाबदारी सोपवत एकप्रकारे त्यांच्यावर अन्याय केला आहे, परंतु हे सर्व करताना कोस्टल रोड प्रकल्पाचे काम ठाकरे सरकारच्या सांगण्यानुसार भिडे यांच्यावर सोपवले होते, त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाल्याचेही पहायला मिळत आहे.
त्यामुळे महापालिकेतही सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले असून, तुर्तास या चर्चा असल्या तरी प्रत्यक्षात मंत्री मंडळ स्थापन झाल्यावर कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते जाते यावर सर्व सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अवलंबून आहेत. त्यामुळे आतापासूनच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी काही सनदी अधिकाऱ्यांनी जुळवून घेत असल्याचेही दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community