मुंबईतील अतिधोकादायक इमारतींना खाली करण्यासंदर्भात महापालिकेकडून नोटीस बजावलेल्यानंतर रहिवाशांकडून घरे केली जात नाही. बऱ्याच इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत तर काही इमारती या रहिवाशी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे खाली करत नाहीत. त्यामुळे प्रत्येक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचे जीव हे महत्वाचे असून जिवितांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने आता नवीन शक्कल लढवली आहे. ज्या इमारतींमधील रहिवाशी घर सोडायला तयार नाहीत, अशा इमातरींच्या आवारातच नाईट शेल्टर बांधून किमान रात्री तरी इमारतीबाहेर ठेवण्याचा विचार महापालिकेने केला आहे. यासाठी पूर्व उपनगरांमध्ये प्रायोगिक तत्वावर इमारतींच्या आवारातच रात्र निवारा उभारण्यात येत आहे.
इमारतीखाली उभारणार नाईट शेल्टर
मुंबईमध्ये मान्सूनपूर्व धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्वे करण्यात येता आणि त्यानुसार सी वन आणि सी टू या अतिधोकादायक व धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्यांना नोटीस पाठवली जाते. परंतु नोटीस दिल्यानंतर अनेक इमारती खाली केल्या जात नाही, बऱ्याच प्रकरणांमध्ये पुन्हा पुन्हा स्ट्रक्चरल ऑडीट केल्यानंतर अतिधोकादायक असलेल्या इमारती धोकादायक यादीत त्यांचा समावेश होतो आणि अशा सी-टू इमारतींची दुरुस्ती केल्यानंतर त्यामध्ये रहिवाशी राहू शकतात. परंतु अनेक अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशी घरे खाली करायला बघत नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्याने रहिवाशी घरे करायला तयार होत नाही आणि महापालिकेलाही इमारतीवर कारवाई करण्यात अनेक अडचणी येतात.
अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशी घरे खाली करायला तयार होत नसल्याने अशा इमारती कोसळून दुघर्टना झाल्यास मालमत्तेसह जिविताचे नुकसान होते. त्यामुळे किमान जिविताचे रक्षण करण्याच्यादृष्टीकोनातून महापालिकेने आता अशा इमारतींच्या बाहेर पावसाळ्याकरता नाईट शेल्टर बांधण्याचा निर्णय घेतला असून प्रायोगिक तत्वावर एम पूर्व, एम पश्चिम, एल आणि एन विभागात अशाप्रकारची नाईट शेल्टर उभारली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : महापालिका कर्मचाऱ्यांना आगावू मिळणार वैयक्तिक आरोग्य विम्याचे १५ हजार रुपये)
मुंबई उपनगर आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा व महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त(पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पूर्व उपनगरातील अतिधोकादायक इमारतींबाबत आढावा घेतल्यानंतर काही इमारती या न्यायप्रविष्ठ प्रकरण म्हणून खाली करता येत नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे पूर्व उपनगरांमधील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा शोध घेऊन त्या इमारती खाली करण्याचा प्रयत्न करावा अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत. परंतु ज्या इमारती न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्याने खाली करता येत नाही अशा इमारतींच्या आवारात किमान रात्रीच्यावेळी तरी रहिवाशांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून नाईट शेल्टर बांधून देण्याचा विचार सुरु आहे. पूर्व उपनगरांमधील काही वॉर्डांमध्ये प्रायोगिक तत्वावर जिथे रहिवाशी इमारती सोडत नाही, अशा इमारतींच्या बाहेर नाईट शेल्टर बांधण्याचे निर्देश विभागीय सहायक आयुक्तांना देण्यात आले आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहर आणि पश्चिम उपनगरांमध्येही अशाप्रकारे नाईट शेल्टर उभारल्या जातील, असे भिडे यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community