राज्यसभेतील विरोधकांच्या आंदोलनाला पवारांची ‘पॉवर; दिवसभरासाठी अन्नत्याग

165
सुशांत सावंत

कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदार यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांच्या या आंदोलनाला राष्टवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईतून पाठिंबा दिला. त्यासाठी ते स्वतःही आज दिवसभर अन्नत्याग करणार आहेत, अशी घोषणा पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.

विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस चर्चा व्हायला पाहिजे होती. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या आग्रहामुळे ही विधेयके तातडीने मंजूर करण्यात आली. त्यासाठी सदनाचे कामकाज रेटण्याचा प्रयत्न झाला. आजवर राज्यसभेत असे कधीच घडले नव्हते. या विधेयकांबाबत सदस्यांना प्रश्न होते, चर्चा करण्याचा आग्रह होता. परंतु हा आग्रह बाजूला ठेवून सभागृहाचे काम पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न झाला. हे नियमाविरुद्ध असल्याचं खासदार सतत सभापतींना सांगत होते. प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली. यावेळी नियमांचं पुस्तक फाडण्याचा प्रकार झाला. मात्र उपासभातींनीही ऐकून घ्यायला हवे होतं. पण ते न करता आवाजी पद्धतीने मतदान घेतले. आवाजी मतदानाने विधेयके मंजूर झाली. त्यामुळे सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. माझी अपेक्षा अशी आहे की उपासभापतींनी सदस्यांना मत मांडायची संधी द्यायला हवी होती. मी महाराष्ट्रात आणि संसदेत काम केलं पण पीठासीन अधिकाऱ्यांकडून असे वर्तन पाहिले नव्हतं. माननीय उपासभापती हे बिहारमधील ज्येष्ठ नेते आहेत, परंतु विचारांना तिलांजली देण्याचे काम सभागृहात झाले असे पवार यावेळी म्हणाले.

…म्हणून पवार कृषी विधेयकावरील चर्चेत होते गैरहजर 

राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी आपण का हजर नव्हतो, याचे स्पष्टीकरणही शरद पवार यांनी दिले. मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीबद्दल मी गेले दोन दिवस राज्य सरकारशी चर्चा करत आहे. मी अनेक कायदे तज्ज्ञांबरोबरही बोललो. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर अपील करणे गरजेचे आहे. त्यासाठी मला मुंबईत थांबावे लागले आणि दिल्लीला जाता आले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

कृषीविषयक केंद्राच्या धोरणात विरोधाभास 

केंद्र सरकारच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याचे शरद पवार म्हणाले. एकीकडे परवानगी दिली जाते, मात्र त्याचवेळी कांद्यावर निर्यात बंदी घातली जाते. जेएनपीटीमध्ये शेतमाल पडून असल्याचे सांगितल्यानंतर परवानगी दिली जाते. पण इतर मालाचे काय? हा विरोधाभास असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.