राज्यात शिंदे-भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना आता विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी शुक्रवार 8 जुलै रोजी पार पडणार आहे. 20 जून रोजी राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण 10 सदस्य निवडून आले होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीत तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना रंगला होता. एकूण 10 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकडून 5 उमेदवारांमध्ये ही लढाई झाली होती. यामध्ये महाविकास आघाडीतील एका उमेदवाराचा पराभव झाला होता.
(हेही वाचाः गोव्यातील हिंदूंच्या धर्मांतरणाला लागला ब्रेक! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा)
भाजपचे लाड
या निवडणुकीत भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड तर मविआतील काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांच्यात चांगलीच चुरस रंगली होती. प्रसाद लाड यांना 28 मते मिळाली असून, चंद्रकांत हंडोरे यांना 22 मते मिळाली आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रसाद लाड यांनी विजयाचा गुलाल उधळला होता.
यांचा होणार शपथविधी
नवनिर्वाचित 10 आमदारांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप तर भाजपचे श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे आमदार शपथ घेणार आहेत.
Join Our WhatsApp Community