स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण शुक्रवार दिनांक ८ जुलै २०२२ या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याहस्ते सकाळी ९. ३० वाजता होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे हा तैलचित्र अनावरण समारंभ होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एस. एस. मोरिया बोटीतून ब्रिटिशांच्या तावडीतून निसटून फ्रान्सच्या मार्सेय येथे पाऊल ठेवले होते, त्या साहसदिनाच्या म्हणजे ८ जुलै १९१० या दिवसाचा योग साधून हे तैलचित्र अनावरण होत आहे.
( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि छबिलदास इंग्रजी माध्यम सीबीएसई शाळा यांचा ऑलिंपिक क्रीडा उपक्रम सुरू)
हे तैलचित्र सुविख्यात चित्रकार सुहास बहुळकर यांनी चितारले असून ते ही या समारंभाला उपस्थित राहाणार आहेत. यावेळी सावरकर स्मारकाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्नील सावरकर हे उपस्थित राहणार आहेत.
Join Our WhatsApp Community