बाळासाहेबांपासून राऊतांपर्यंत वादग्रस्त विधानांची राजकीय मालिका! फक्त एका क्लिकवर…

158

राजकारणाचा दर्जा घसरला, असे जनता तेव्हाच म्हणते जेव्हा राजकीय पातळीवर राजकारणी बोलताना तारतम्य विसरून जातात. एकमेकांवर टीका करताना त्यांची जीभ घसरते आणि त्यातून आपापसातील नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होतो. राजकारणी हे लोकप्रतिनिधी असतात, ते जनतेचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे त्यांच्याकडून केली जाणारी वादग्रस्त वक्तव्ये ही समाजात वादंगही निर्माण करतात. त्यामुळे राजकारण्यांनी बोलताना तारतम्य बाळगायला हवे, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. नुकतेच ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सुरु असताना त्याला स्थानिक मुसलमानांनी तीव्र विरोध केला होता, तेव्हा समाजवादी पक्षाचे आमदार लालबिहारी यादव म्हणाले, ‘आम्ही शिवलिंग कसे स्वीकारू शकतो. भगवान शंकर माणूस होता की दगड? माणूस कातडीचा आणि हाडाचा असेल की दगडाचा? या ठिकाणी दगड सापडला आहे,’ तर काहींनी यावर अश्लील विधानेही केली. त्यानंतर भाजपाच्या नेत्या नुपूर शर्मा यांना टीव्हीवरील चर्चेत सूत्रसंचालकाने या विषयावरून भडकावले. त्यामुळे त्यांनी महमंद पैगंबराविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. परिणामी देशभर वाद निर्माण झाला. हे ताजे उदाहरण आहे. पण याआधी महाराष्ट्रात राजकारण्यांनी अशी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती, ज्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांमुळे नामांतराचा वाद पेटला!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायम सांगत की, आपण शिवसेनेत जातपात पाळत नाही. त्यामुळे समाजातील सर्वात छोट्या घटकांना त्यांनी खासदार, आमदार, मंत्री केले. मात्र जात-पात न मानणा-या बाळासाहेबांनी औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला मात्र विरोध केला होता. 6 डिसेंबर 1994 रोजी नांदेडच्या जाहीर सभेत बाळासाहेबांनी ‘भाकरीचे पीठही ज्यांना मिळत नाही त्यांना विद्यापीठ कशाला?’ असा प्रश्न विचारून नव्या वादाला तोंड फोडले होते.

शरद पवारांनी धार्मिक भावना दुखावल्या 

मे २०२२ मध्ये एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या एका भाषणात विद्रोही कवी जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या एका कवितेचा उल्लेख करत म्हणाले, ‘ब्रम्हा-विष्णू-महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या. तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि साल्यांनो त्या मंदिरात आम्हाला येऊ देत नाहीत. हा तुमचा देव आम्ही आमच्या छिन्नीने बनवला. तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय आम्ही सहन करणार नाही. अशा प्रकारचे ते काव्य मला आठवतं जव्हारने ते लिहून ठेवलं आहे.’ यानंतर शरद पवार नास्तिक आहेत म्हणून त्यांनी आस्तिक, धार्मिक हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या, अशी टीका होऊ लागली. त्यानंतर पवार पुढील काही दिवस जाणीवपूर्वक देवदर्शन करत आपण देवा धर्माच्या विरोधात नसल्याचे दाखवून देत होते.

(हेही वाचा शिवसेनेच्या वेबसाईटवर एकनाथ शिंदे शिवसेना नेतेच! उपनेते पदी शिंदे गटातील आमदार कायम)

अजित पवारांनी केलेल्या वक्त्यव्याचे घेतले प्रायश्चित्त

६ एप्रिल २०१३ रोजी इंदापूर येथे जाहीर सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, ‘धरणात पाणी नसेल तर, काय मुतता तिकडे जाऊन, पाणी प्यायला मिळेना त्यामुळे लघवी पण होईना. रात्री २ वाजताच लाईट जाते, अलीकडे रात्री जसे जसे वीज जायला लागली तसं तसं मुलं इतकी जन्माला यायला लागली की काय विचारू नका, कारण लाईट नसल्यावर काय काम आहे? तुम्ही म्हणाल अजित पवार देवदास टाकून आला आहे का?’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अजित पवार बरेच वादात सापडले होते. त्यानंतर अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचा पुतळ्याखाली एक दिवस अन्न पाण्याशिवाय राहून प्रायश्चित्त केले होते.

आर आर पाटलांना ‘त्या’ विधानावरून राजीनामा द्यावा लागला 

२००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी माध्यमांशी हिंदी भाषेत बोलताना तेव्हाचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी ‘बडे बडे शहरों में छोटी छोटी बाते होती रहती है’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे बराच वाद उफाळून आला. त्यानंतर पाटील यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

जवानांचा अवमान केल्याने आमदार परिचारक झालेले निलंबित 

फेब्रुवारी २०१७ साली आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापुरात स्थानिक निवडणूक प्रचारात भाषण करताना ‘सीमेवरील सैनिक वर्षभर घरी जात नाही. मात्र, आपल्याला मुलगा झाल्याचे पेढे सहकाऱ्यांना वाटतो,’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे परिचारिक यांच्याविरोधात मोठा वाद निर्माण झाला होता. राज्यभर आंदोलने झाली होती. विधिमंडळात याविरोधात मोठ्या प्रमाणात विरोध झाला तेव्हा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी आमदार परिचारक यांना दीड वर्षांसाठी निलंबित केले होते. 

राम कदमांनी मुलींचा केला अपमान मागितली माफी 

४ सप्टेंबर २०१८ रोजी भाजपाचे आमदार राम कदम सभेत बोलताना त्यांची जीभ घसरली, उपस्थित तरुण कार्यकर्त्यांना संबोधित करताना ‘कोणतंही काम असेल तर मला भेटा. अगदी एखाद्या मुलीला प्रपोझ केलं असेल आणि ती नाही म्हणत असेल तरी माझ्याकडं या. मी १०० टक्के मदत करेन. तुमच्यासाठी त्या मुलीला पळवूनही आणेन’, असे वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्या विरोधात महिला संघटनांनी तीव्र निषेध केला. अखेरीस राम कदम यांना माफी मागावी लागली आणि पुढील काही महिने आमदार कदमांना माध्यमांशी बोलण्यापासून भाजपाने प्रतिबंध केला होता.

तानाजी सावंतांच्या वक्तव्याने वाद  

६ जुलै २०१९ रोजी तिवरे धरणफुटीनंतर माध्यमांशी बोलताना जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी, ‘धरण जवळपास 2004 साली कार्यान्वित झाले. 15 वर्षं झाली त्यात पाणी साठतं. पण कोणतीच दुर्घटना घडली नव्हती. तिथं खेकड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यातूनच गळती सुरू झाली’, असे वक्तव्य केले. त्यामुळे वाद पेटला होता. मंत्री तानाजी सावंत यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले होते.

आमोल मिटकरींनी कन्यादान धार्मिक संस्काराचे केले विडंबन  

२१ एप्रिल २०२२ रोजी सांगलीतील सभेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक किस्सा सांगत असताना म्हणाले, ‘एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान सुरु होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार?”, असे मिटकरी म्हणाले होते. त्यानंतर या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने राज्यभरातून ब्राह्मण संघटनांनी निषेध सुरु केला. अखेर एनसीपी अध्यक्ष शरद पवारांनी ब्राह्मण संघटनांची बैठक घेतली, त्यानंतर मिटकरींना पुन्हा अशा प्रकारचे वक्तव्य करू नये, असे खडसावले.

संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतील बंड आणखी पेटले 

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेतील ४० आमदार घेऊन महाराष्ट्राबाहेर गेले, त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आमदारांविषयी अत्यंत हिणकस वक्तव्य केले. राऊत म्हणाले, ‘ज्याने बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी केली, तो संपला, बाळासाहेबांचे शाप लागले. एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोर जा. गुलाब पाटलांची भाषणे पाहिली तर शिवसेनेत हाच एक असा दिसला. पण तुझ्या मायला आता ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही. आता गुवाहाटीमधून थेट 40 मृतदेह येतील, त्यांना थेट शवागरात पाठवण्यात येणार’, असे वक्तव्य केले. राऊतांच्या या अशा वक्तव्यांमुळे आमदारांचे बंड शांत होण्याऐवजी ते आणखी पेटले, अखेरीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आले आणि सरकार कोसळले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.