‘बेस्ट’ AC डबल डेकर बस सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल!

115

बेस्ट प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर व्हावा आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही वाढावी यासाठी लंडनच्या धर्तीवर पहिली वातानुकूलित दुमजली बस सप्टेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये एक दुमजली वातानुकूलित नमुना बस दाखल होणार आहे. याची चाचणी पूर्ण झाल्यावर सप्टेंबरमध्ये प्रत्यक्षात ही बस सेवेत येणार आहे. मुंबईतील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस ७ ऑगस्ट रोजी म्हणजेच ‘बेस्टच्या स्थापना दिनानिमित्त’ लॉंच करण्यात येणार आहे.

प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक

बेस्टकडे १५ वर्षांपूर्वी ९०१ दुमजली बस होत्या. डिसेंबर २०१९ पर्यंत या बसचा ताफा १२० होता आता दुमजली बसची संख्या ४५ आहे. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात मात्र दुमजली बसची क्षमता ७४ आहे. एकमजली आणि दुमजली बसचे आकारमानही सारखेच असते. त्यामुळे या दोन्ही प्रकारातील बस रस्ता व्यापण्याचे प्रमाण सारखेत आहे. त्यामुळे दुमजली बसमधून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक असल्यामुळे उपक्रमाकडून दुमजली बसची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे.

दुमजली बसची वैशिष्ट्ये

  • नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
  • बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
  • दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.
  • सीसीटीव्ही कॅमेरे, बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्था असेल.

चार्जिंग स्टेशन उभारणार

९०० इलेक्ट्रिक बसेसला मंजूर मिळाल्यामुळे २२५ ट्विन डेक बसचा पहिला ताफा वर्षाअखेरीस दाखल होणार आहे. बेस्टने ९०० एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस १२ वर्षांसाठी वेट लीजवर करण्याच्या कराराला मंजुरी दिली होती यातील पहिला ताफा ऑगस्ट महिन्यात दाखल होईल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच महानगरात इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी जवळपास ५५ ठिकाणे निवडण्यात आली आहेत. पुढील ३ ते ४ महिन्यांत आणखी चार्जिंग स्टेशन उभारले जातील. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांच्या फायदा होईल असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले. सीएसएमटी ते बॅकबे आगार हा डबल डेकर बसचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. यावर्षी २२५ डबल डेकर बसेस मुंबईत दाखल होतील. तर दुसरा एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा ताफा मार्च २०२३ पर्यंत मुंबईत दाखल होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.