मुंबईला ‘रेड अलर्ट’चा इशारा ठरला खोटा, हवामान खाते पडले तोंडघशी

131
सलग तीन दिवस मुसळधार पावसाने मुंबईकरांना वेठीस धरले. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने मुंबईसाठी शुक्रवारी अतिवृष्टीसह रेड अलर्ट जारी केला. मात्र प्रत्यक्षात वरुणराजाने हवामान खात्याला चांगलेच तोंडावर आपटवले. कारण शुक्रवारी पावसाची साधी एक सरही पडली नाही, अखेर मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दुपारी अंदाजपत्रात बदल जाहीर करत मुंबईत दिवसभरात मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील, काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, असे म्हटले.

अतिवृष्टीच्या अलर्टमुळे भय

मुंबईत सकाळपासून विविध ठिकाणी पावसाचा जोर कमी असल्याने जनजीवन पूर्ववत होत आहे, मात्र अतिवृष्टीचा अलर्ट असल्याने प्रत्येकजण स्वतःजवळ छत्री, रेनकोट जवळ बाळगतच प्रवास करत होता. गुरुवारीही इतर दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असला तरीही रेल्वे आणि बस प्रवास संथगतीनेच सुरु होता. सकाळपासून मुंबईत केवळ १० ते १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून केवळ दिंडोशी परिसरात ६२.४७ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या नोंदीतही कुलाब्यात ५२.८ मिमी, तर सांताक्रूझला ४१.१ मिमी पाऊस झाला. पावसाचा जोर कमी असल्याने सायंकाळी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पावसाची गैरहजेरी पाहता अखेर शुक्रवारी दुपारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देत जाहीर केलेला रेड अलर्ट मागे घेतला आहे. या तिन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टीची केवळ शक्यता असून आता ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तिन्ही जिल्ह्यांत मंगळवारर्यंत अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट राहील, असा नवा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दुपारी जाहीर केला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.