उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पण याबाबतच आता शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात येत आहे. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्याबाबत शिवसेनेकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याबाबतच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे.
शिंदे-भाजप युतीने बहुमत सिद्ध केले आहे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेंना सत्तास्थापनेसाठी दिलेले आमंत्रण यात काही चूक नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर जर राज्यातील सरकार बरखास्त झालं असेल तर राज्यातील दुस-या मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करण्याची तरतूद संविधानात आहे. त्यानंतर तो पक्ष सभागृहात आपलं बहुमत सिद्ध करतो. त्याप्रमाणे शिंदे-भाजप युतीने हे बहुमत सिद्ध करुन दाखवलं आहे. त्यामुळे आपलं भाष्य हे संविधानातील तरतुदींना अनुसरुन असेल तर त्याने जनतेत संभ्रम निर्माण होत नाही. त्यामुळे घटनेतील तरतुदी आणि विधीमंडळाच्या नियमांप्रमाणे आपण काम करायला हवं अशी माझी राजकीय पक्षांना विनंती असल्याचे राहुल नार्वेकर यांनी यावेळी म्हटले आहे.
(हेही वाचाः विधीमंडळात बहुमत असलेला पक्षच ग्राह्य धरला जातो, शिवसेनेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांची प्रतिक्रिया)
शिवसेनेची न्यायालयात याचिका
शिंदे गटातील 16 आमदारांवर कारवाई करण्याच्या शिवसेनेच्या याचिकेवर 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आता आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते, राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे.
Join Our WhatsApp Community