मंगळवारपासून मुंबई, नवी मुंबई ते संपूर्ण कोकणात धो-धो बसरणा-या पावसामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात घटल्याचे निदर्शनास आले. मंगळवारपासून मुंबईतील हवेचा दर्जा चांगला असून, वातावरणातील पावसाच्या प्रभावाने शनिवारीही हवेची गुणवत्ता चांगलीच राहील, असे सफर या प्रणालीतून जाहीर करण्यात आले. बुधवारपासून नवी मुंबईतील बेलापूर-खारघर परिसरात दृष्टमानता अधूनमधून क्षीण दिसून येत होती. आता या भागांत दृष्टमानता पूर्ववत होत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
हवेचा दर्जा केवळ २५ वर दिसून येईल
मुंबईत मंगळवारच्या पावसानंतर हवेतील गुणवत्ता सुधारल्याने मुंबई, नवी मुंबईला सफर प्रणालीतून हिरवा रंग मिळाला. मुंबई, नवी मुंबई भागांत सूक्ष्म धूलिकण पावसात प्रचंड प्रमाणात विरल्याने आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे संकेत सफर प्रणालीतून दिले गेल. सलग तीन दिवस पावसाच्या मा-याने मुंबईत आणि नवी मुंबईत हवेची गुणवत्ता ३३ पर्यंत आढळून येत होती. शुक्रवारी पावसाच्या गैरहजेरीत हवेची गुणवत्ता ४२ वर पोहोचली, तरीही हवेचा दर्जा चांगलाच कायम असून, आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे सफरकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र मुंबईत येत्या काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने हवेचा दर्जा अजून सुधारेल, अशी शक्यता सफरकडून व्यक्त करण्यात आली. शनिवारी हवेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ब-याच अंशी कमी राहील. हवेचा दर्जा केवळ २५ वर दिसून येईल, असा अंदाज सफरच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
Join Our WhatsApp Community