मार्साय येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे- रणजित सावरकर

166

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्साय समुद्रात मारलेल्या ऐतिहासिक उडीला 8 जुलै रोजी 112 वर्षे पूर्ण झाली आहेत. दरवर्षी हा दिवस साहस दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. विधानसभेचे निवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मार्साय बंदरात स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.

मार्साय समुद्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मारलेली उडी ही अयशस्वी असल्याचा प्रचार करण्यात येतो. पण सावरकरांची उडी हा ऐतिहासिक होती. त्यांच्या एका उडीने जगात फार मोठा भूकंप झाला. इंग्रज आपल्या देशावर बळजबरीने राज्य करत आहेत हे सत्य संपूर्ण जगाला सावरकरांच्या त्या उडीमुळे कळलं. भारताचा स्वातंत्र्यलढा त्या उडीमुळे जगाच्या पटलावर आला.

पाठपुरावा करण्याची गरज

त्या मार्साय बंदरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक व्हावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींकडून अनेक वर्ष पाठपुरावा करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची सावरकरांच्या या स्मारकासाठी आर्थिक सहाय्य करण्याची देखील तयारी आहे. पण मार्साय येथील नगरप्रशासनाला हा प्रस्ताव भारत सरकारकडून देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. पण केंद्रात हे प्रकरण फार पूर्वीपासून अडकून पडले आहे. केंद्रातील आताच्या सरकारकडे सत्ता आणि शहाणपण दोन्ही आहे त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा लावून धरणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजपने प्रयत्न करावेत, अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली आहे.

सावरकरांचे संसदीय क्षेत्रातील योगदान

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना अस्सल मराठी शब्द दिले आहेत. कायदा या परशीयन शब्दाला विधी हा शब्द सावरकरांनी दिला आहे आणि वकील म्हणजेच कायद्याचा तज्ज्ञ म्हणून तो विधीज्ञ असा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला आहे. अनेक संसदीय शब्द हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीतून दिले आहेत. विधान परिषद, विधीमंडळ हे शब्द सावरकरांनी दिले आहेत. सावरकरांना कधीही संसदेत जाता आलं नाही, पण त्यांनी संसदीय क्षेत्रात हे जे योगदान दिले आहे त्याची माहिती विधीमंडळातील सदस्यांना व्हावी, अशीही मागणी रणजित सावरकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.