वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुरू असलेली ‘एचएमआयएस’ (HMIS) प्रणाली बुधवारपासून बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवा घेण्यासाठी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रूग्णांची नोंद कशी करायची हा प्रश्न रुग्णालय प्रशासनापुढे उभा राहिला आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ AC डबल डेकर बस सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल!)
एचएमआयएस प्रणाली बंद
राज्य सरकारने (HMIS) सिस्टिम बंद करण्याचा निर्णय घेतल्याने संगणाकाऐवजी पुन्हा एकदा कागद-पेन घेऊन कर्मचाऱ्यांना रुग्णांची नोंद करावी लागत आहे. (HMIS) या सिस्टिमद्वारे रूग्णांची संपूर्ण नोंद पेपरलेस पद्धतीने होते. रुग्णांचे नाव, पत्ता, आजार सुरू असलेली उपचार पद्धती या सिस्टिममध्ये या सर्वांची नोंद असते. परंतु आता ही सिस्टिम बंद केल्यानंतर ही संपूर्ण माहिती कोणत्या पद्धतीने भरायची याची स्पष्टता करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनामध्येही गोंधळ निर्माण झाला आहे.
रुग्णसेवेवर परिणाम रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली
जे.जे. रुग्णालय समूह, कामा व आल्ब्लेस, सेंट जॉर्ज रुग्णालय, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, नांदेड, लातूर, आंबाजोगाई, ससून, अकोला, सांगली, मिरज, गो.ते.रुग्णालय मुंबई, यवतमाळ येथील १६ वैद्यकीय महाविद्यालयांना हे (HMIS) सिस्टिम बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णांच्या एक्स रे, एमआरआय तसेच इतर वैद्यकीय चाचण्यांच्या नोंदी लेखी पद्धतीने कशा जतन करायच्या हा प्रश्न आता उभा ठाकला आहे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या सिस्टिममुळे रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय अहवाल ठेवण्याबरोबरच संशोधनाच्या कामालाही गती मिळत होती. मात्र ही सिस्टिम बंद झाल्यामुळे याचा फटका आता रुग्णसेवेला बसू लागला आहे. केसपेपर काढण्यापासून रुग्णांच्या तपासण्यांची नोंद कागद पेन घेऊन करावी लागत आहे. तसेच यासाठी मनुष्यबळाचीही कमतरता भासत आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येऊन याचा रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे.
Join Our WhatsApp Community