राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत असताना आता मृत्यूची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. गुरुवारी, ७ जुलै रोजी राज्यात ८ कोरोनाबाधितांच्या मृत्यूपाठोपाठ शुक्रवारीही सात रुग्णांचा मृत्यू झाला. मधुमेह आणि रक्तदाबावर नियंत्रण न राहिलेल्या रुग्णांना वाचवण्यात अपयश येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-यांकडून मिळाली.
दहा दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या घटतेय
ओमायक्रॉनच्या नव्या बीए व्हेरिएंटमुळे गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येत वाढ दिसून येत होती. कोरोना आता सर्दी, खोकल्यासारखाच स्थानिक स्वरुपाचा झाल्याने रुग्णसंख्या दिसून येणारच, असे आरोग्य विभागाकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. दहा दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली होती. मात्र मुंबईसह राज्यातील विविध भागांत आता कोरोनाच्या रुग्णांचे उपचारादरम्यान मृत्यू होऊ लागले आहेत. केवळ शरीरातील इतर आजार नियंत्रणात नसल्याने ही समस्या उद्भवल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली. दरम्यान, डिस्चार्ज रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णसंख्या ब-यापैकी आता आटोक्यात येत आहे. शुक्रवारी राज्यात २ हजार ९४४ नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ३ हजार ४९९ रुग्ण कोरोना रुग्णांतून बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९१ टक्के दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community