दादर पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात मुंबईकर खरेदीसाठी येत असतात. दादरमधील फेरीवाले कायमच चर्चेचा विषय ठरलेले आहेत. आणि स्थानकाच्या जवळील प्रत्येक रस्त्यांचे फुटपाथ या जणू काही फेरीवाल्यांना आंदणच दिले की काय असा प्रश्न मुंबईकरांना पडत आहे. मात्र, या फेरीवाल्यांमुळेच पदपथांचा विकास केला जात नसून पाच वर्षात स्थानिक नगरसेवकाने या पदपथांच्या विकासाकरिता कोणत्याही प्रकारे प्रयत्न केलेला नाही. या पदांचा विकास केल्यास फेरीवालांचा धंदा बुडेल यासाठी पदपथांची सुधारणा करण्यात येत असल्याने दादरमधील येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे पाय खड्डयात जात आहे. पेव्हर ब्लॉकमुळे पदपथांमुळे पादचाऱ्यांना आता आदळत, आपटत आणि अंगावर चिखल पाण्याची पिचकारी उडवत चालावे लागत आहे.
( हेही वाचा : Sunday Megablock : रविवारी बाहेर पडताय? जाणून घ्या रेल्वे मेगाब्लॉक अपडेट)
पदपथांवरील पेव्हरब्लॉक उखडलेले
दादर पश्चिमेतील न्यायमूर्ती रानडे मार्ग, जावळे मार्ग, डिसिल्व्हा रोड आणि एन.सी केळकर या चार रस्त्यांच्या पदपथांवर पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. आणि या सर्व रस्त्यांवरील पदपथांवर दाटीवाटीने अतिक्रमण करत फेरीवाले बसलेले आहेत. मात्र या सर्व पदपथावरील पेव्हरब्लॉक अनेक ठिकाणी उघडलेले आहेत. त्यामुळे या पदापथांवरून चालताना नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. तर अनेक भागात पेव्हर ब्लॉक खचून खड्डे पडले आहेत. मात्र कोविड संपल्यानंतरही महापालिकेने कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही. ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने या भागातील पदपथांवरील उखडलेल्या पेव्हर ब्लॉकबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेला आता एक वर्ष उलटत आले आहे. मात्र एक वर्षात या चारही रस्त्यांवरील कुठल्याही पदपथांच्या पेव्हरब्लॉकची सुधारणा करण्यासाठी ना नगरसेवकाने पुढाकार घेतला ना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी.
दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकापासून कबूतर खान्याला वळसा घालून गोल मंदिरापर्यंत जाणाऱ्या पदपथांवर पेवर ब्लॉक असले तरी याठिकाणांहून चालताना चिखलातून चालतो की काय असा भास होत आहे. कबूतर खान्यातील समोरील पदपथावर मागील आठ ते दहा दिवसांपासून पेव्हर ब्लॉक खचून मोठा खड्डा निर्माण झालेला आहे. मात्र पेव्हर ब्लॉकची सुधारणा अद्यापही करण्यात आलेली नाही. याठिकाणी या खड्ड्यातून चालत जावे लागत आहे. हा खड्डा टाळत चालताना नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. तर त्यापुढील सौराष्ट्र फरसाण दुकानाच्या आसपास तर पूर्णपणे पेव्हर ब्लॉक एवढे निखळून पडले आहे की चालताना पायाला ठेच लागत आहे, तर बऱ्यादा यातील चिखलाचा अभिषेक अंगावर होतो.
दादर सारख्या विभागांमध्ये महापालिका प्रशासनाचे आणि तत्कालीन नगरसेवकांचे कोणतेही लक्ष नसल्याने या फेरीवाल्यांना व्यावसाय करता यावा म्हणून पदपथांची सुधारणा केली जाणार नसेल तर मग या पदपथावरील उखडलेल्या पेव्हर ब्लॉकवरून अडखळत नागरिकांना चालत जावे लागत आहे. या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी स्थानिक नगरसेविका प्रीती प्रकाश पाटणकर आणि तत्कालिन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनीही कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केले दिसत नाही. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी पदपथांची सुधारणा केल्यास फेरीवाल्यांना आपले धंदे बंद ठेवावे लागतील आणि हे त्यांना धंदे बंद ठेवावे लागू नये म्हणून महापालिका प्रशासन आणि नगरसेवक या पदपथांची सुधारणा करण्याकडे लक्ष देत नव्हते. मात्र, अशा तुटलेल्या अवस्थेतील पदपथांवरून जनतेने चालायचं तरी कसे असा प्रश्न लोकांनाच पडू लागलाय.
Join Our WhatsApp Community