अति धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश

120

अति धोकादायक इमारतींची प्राधान्यक्रम यादी निश्चित करून सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार मुंबई पोलिसांच्या सहकार्याने या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात. त्याचबरोबर दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणीही सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी. या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर यांनी अति धोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून आवश्यक असणारे सहकार्य महानगर पालिकेला तात्काळ उपलब्ध करून दिले जाईल, असा विश्वास मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष व अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक

मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे या मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष असून अतिरिक्त आयुक्त (शहर). आशिष कुमार शर्मा हे मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या अध्यक्ष महोदयांच्या मार्गदर्शनात  पावसाळ्या दरम्यानच्या एका विशेष बैठकीचे आयोजन शुक्रवारी, ८ जुलै रोजी सायंकाळी करण्यात आले होते. महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सभागृहात आयोजित या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आर. डी. निवतकर, मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी हे विशेषत्वाने उपस्थित होते. त्याचबरोबर महानगरपालिकेचे उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, महानगरपालिकेच्या विविध परिमंडळाचे उपायुक्त, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रशासकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रतिनिधी, मुंबई अग्निशमन दलाचे व मुंबई सुरक्षा दलाचे संबंधित अधिकारी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख संगीता लोखंडे यांच्यासह विविध संस्थांचे अधिकारी व  प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मध्य व पश्चिम रेल्वे, बेस्ट उपक्रम, तटरक्षक दल, म्हाडा, एम.एम.आर.डी.ए., एम.टी.एन.एल., वाहतूक पोलीस, विविध रुग्णालये, विविध स्वयंसेवी संस्था इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

(हेही वाचा ‘या’ कारणामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेय)

तक्रार प्राप्त झाल्यास २४ तासांत करवाई

याच बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्या विषयी आवश्यक ती कार्यवाही २४ तासांच्या आत करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व प्रशासकीय विभागांना दिले. दरम्यान आजच्या बैठकीच्या सुरुवातीला संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. तसेच संगणकीय सादरीकरणाच्या आधारे आतापर्यंतच्या पावसाळ्यात घडलेल्या घडामोडी याबाबतची संक्षिप्त माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. आजच्या बैठकीदरम्यान आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध साधक-बाधक बाबींवर चर्चा झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.