मुंबईतील खासगी वीज कंपन्यांच्या वीज वापरणाऱ्या ग्राहकांना या महिन्यापासून वीजबिलासाठी अधिक पैसे भरावे लागणार आहेत. अदानी इलेक्ट्रिसिटी व टाटा पॉवर या कंपन्यांनी इंधन समायोजन आकार अर्थात वीज खरेदी खर्चात वाढ झाल्याबद्दल हे अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सरासरी ९० पैसे ते १ रुपये प्रति युनिट असे हे शुल्क आकारले जाणार आहे. हे दर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमांनुसार असल्याचे दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
खासगी कंपन्यांची वीज महागली
गेली दोन वर्ष कोरोना संकटांमुळे वीजखरेदी वसुली हा कर लावण्यास महाराष्ट्र वीज नियामत आयोगाने मनाई केली होती. परंतु १ एप्रिल २०२२ पासून हा आकार देयकावर लावण्याची मंजुरी आयोगाने वीज वितरण कंपन्यांना दिली आहे. या मंजुरीची अंमलबजावणी अदानी इलेक्ट्रिसिटी व टाटा पॉवर या मुंबईतील वीज वितरण कंपन्या जुलै महिन्यापासून करणार आहेत.
( हेही वाचा : आता बॅंकेच्या पासबुकवर लागणार १८ टक्के GST! कोणत्या वस्तू महागणार? वाचा यादी)
टाटा पॉवरला उन्हाळ्यादरम्यान वीज खरेदीसाठी २७३ कोटी रुपये अतिरिक्त खर्च आला त्यातील २३८ कोटी रुपये ग्राहकांकडून वसूल केले जाणार आहेत. यासाठी जुलै ते नोव्हेंबरच्या बिलात प्रति युनिट सरासरी ९० ते ९५ पैसे अतिरिक्त कर लावला जाणार आहे. दरम्यान राज्य सरकारी महावितरण कंपनीकडून सुद्धा इंधन समायोजन आकार अंतर्गत वसुली सुरू करण्यात आली आहे.
राज्य सरकारी महावितरणच्या इंधन समायोजन आकारात कशी वाढ झाली?
- 0 ते 100 युनिट आधी 10 पैसे, आता 65 पैसे
- 101 ते 300 युनिट आधी 20 पैसे , आता 1 रुपये 45 पैसे
- 301 ते 500 युनिट आधी 25 पैसे, आता 2 रुपये 05 पैसे
- 501 युनिटच्या वर आधी 25 पैसे, आता 2 रुपये 35 पैसे