उत्तर मुंबईतील कांदिवली आर दक्षिण विभागात एका नवीन प्रभागाची वाढ झाली आहे. मागील महापालिका निवडणुकीत महिलांसाठी ४ प्रभाग राखीव होते. त्या तुलनेत आगामी निवडणुकीत या प्रशासकीय प्रभागात महिलांकरता ७ प्रभाग राखीव आहेत. मागील निवडणुकीतील ४ प्रभागांच्या तुलनेत ७ प्रभाग खुले झाले आहेत. त्यामुळे महिला आणि पुरुषांना समसमान संधी असणारा कांदिवली आर दक्षिण विभाग आहे.
या प्रभागात कमलेश यादव यांच्या प्रभागाचे दोन प्रभाग आहेत. त्यातील एक प्रभाग ३३ हा महिला राखीव झाला असून, प्रभाग ३२ हा खुला झाला आहे. त्यामुळे प्रभाग ३२ खुल्या झाल्याने कमलेश यादव यांच्या आशा पल्लवित झाल्या असून या प्रभागात ते आता दावेदारी सांगू शकतात.
अशी आहे प्रभाग रचना
शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांचा प्रभाग खुला झाल्याने त्याठिकाणी गुडेकर यांचा मुलगा की शाखाप्रमुख यांचा नंबर लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर भाजपचे दिपक तावडे यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्यामुळे त्यांना नवीन प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. भाजपच्या प्रतिभा गिरकर, प्रियंका मोरे, सुरेखा पाटील यांचे प्रभाग महिला आरक्षित झाल्याने ते सेफ झोनमध्ये आहेत. तर भाजपच्या शिवकुमार झा यांचा प्रभाग महिला आरक्षित झाला आहे, तर सुनीता यादव यांचा प्रभाग खुला झाला आहे. परंतु झा यांचा हा प्रभाग सुनीता यादव यांचा जुना प्रभाग असून, त्या प्रभागात सुनीता यादव गेल्या तर त्यांच्या प्रभागातून झा किंवा पक्षाच्या अन्य कुणाला संधी मिळू शकते.
तर भाजपचे सागरसिंह ठाकूर यांचा प्रभाग खुला झाल्याने त्यांचे टेन्शन निघून गेले आहे. तर शिवसेनेच्या माधुरी भोईर यांचा प्रभाग खुला झाल्याने त्यांचे पती योगेश भोईर यांना पुन्हा महापालिकेत परतण्याची संधी प्राप्त झाली आहे. मागील निवडणुकीत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या प्रितम पंडागळे यांचा प्रभाग खुला झाल्याने याठिकाणी पक्ष कुणाला उमेदवारी देते, याकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.
- सन २०१७चे प्रभाग आरक्षण(१३) : महिला प्रवर्ग : ४, ओबीसी महिला : ०३, ओबीसी खुला :०१, खुला प्रवर्ग : ४, एससी महिला : ०१
- सन २०२२चे प्रभाग आरक्षण(१४) : महिला प्रवर्ग : ०७, खुला प्रवर्ग : ०७,
- प्रभाग १९ः महिला(शुभदा गुडेकर, शिवसेना), नवीन प्रभाग क्रमांक : २०, नवीन आरक्षण : खुला
नवीन प्रभाग रचना :चारकोप सेक्टर १ व २, चारकोप गाव, चारकोप इंडस्ट्री
- प्रभाग २०ः खुला प्रवर्ग(दिपक तावडे, भाजप), नवीन प्रभाग क्रमांक : २१, नवीन आरक्षण : महिला, नवीन प्रभाग रचना : सह्याद्री नगर, साईनगर, बंदर पाखाडी, हनुमान मंदिर रोड
- प्रभाग २१ः ओबीसी महिला(प्रतिभा गिरकर, भाजप), नवीन प्रभाग क्रमांक : २२, नवीन आरक्षण : महिला, नवीरप्रभाग रचना : न्यू लिंक रोडच्या जंक्शनपासून बोरसापाडापर्यंत, डहाणूकरवाडी, महावीर नगर, मोहन नगर आदी परिसर
- प्रभाग २२ः ओबीसी महिला (प्रियंका मोरे, भाजप), नवीन प्रभाग क्रमांक : २३, नवीन आरक्षण :महिला, प्रभाग रचना : गांवदेवी रोड व पश्चिम रेल्वेच्या लाईनच्या जंक्शनपासून एस व्ही रोड, मथुरादास रोड, पारेख नगर, पटेल नगर, कमला नगर
- प्रभाग २३ः खुला(शिवकुमार झा, भाजप), नवीन प्रभाग क्रमांक : २५, नवीन आरक्षण : महिला, प्रभाग रचना : राजीव गांधी मैदानाच्या पूर्वेकडील डिपी रोडच्या जंक्शनपासून रेयॉन इंटरनॅशनल स्कूल, सेंट लॉरेन्स हायस्कूल, गांवदेवी, जनता नगर पोयसर पूर्व
- प्रभाग २४ः महिला(सुनीता यादव, भाजप), नवीन प्रभाग क्रमांक : २४, नवीन आरक्षण : खुला, प्रभाग रचना :पश्चिम रेल्वे लाईन व गांवदेवी रोड जंक्शनपासून पूर्वेकडे बिहारी टेकडी रोडपर्यंत, भाजीवाडी, ठाकूर कॉम्प्लेक्स, सेंट्रल ऑर्डन्स डेपो
- प्रभाग २५ः महिला(माधुरी भोईर, शिवसेना), नवीन प्रभाग क्रमांक : २६, नवीन आरक्षण : खुला, नवीन प्रभाग रचना :पश्चिम द्रुतगती महामार्ग व ठाकूर व्हिलेज रोडच्या जंक्शनपासून शाम नारायण ठाकूर मार्ग ओलांडून नॅशनल पार्कपर्यंत. दत्तानी पार्क, हुजेफा नगर, समता नगर, एनजी सन सिटी फेज २ आदी परिसर
- प्रभाग २६ः अनुसूचित महिला(प्रितम पंडांगळे, भाजप), नवीन प्रभाग क्रमांक : २७, नवीन आरक्षण : खुला,नवीन प्रभाग रचना : समता नगर रोड जंक्शनपासून ते रामसिंग रोडपर्यंत … सरोव्हा कॉम्प्लेक्स, दामू नगर, सिंग इस्टेट, देवपाडा
- प्रभाग २७ः ओबीसी महिला(सुरेखा पाटील, भाजप), नवीन प्रभाग क्रमांक : २८, नवीन आरक्षण : महिला, प्रभाग रचना : कांदिवली लोखंडवाला टाऊनशिप, महिंद्रा कंपनी, म्हाडा कॉलनी
- प्रभाग २८ः ओबीसी(राजपती यादव, काँग्रेस/ एकनाथ हुंडारे, शिवसेना), नवीन प्रभाग क्रमांक : २९, नवीन आरक्षण : महिला, प्रभाग रचना : हनुमान नगर, वडार पाडा आदी परिसर
- प्रभाग २९ः खुला प्रवर्ग(सागरसिंह ठाकूर, भाजप), नवीन प्रभाग क्रमांक : ३०, नवीन आरक्षण : खुला, प्रभाग रचना : दादासावे रोड, दुर्गामंदिर स्ट्रीट,अशोक नगर,पद्मबा नगर
- प्रभाग ३०ः महिला प्रवर्ग (लिना पटेल देहेरकर, भाजप), नवीन प्रभाग क्रमांक : ३१, नवीन आरक्षण : खुला, नवीन प्रभाग रचना : फाटक रोड, भद्रन रोड नंबर२, गोरसवाडी, कमला नगर, बालभारती कॉलेज परिसर, शंकर लेन
- प्रभाग ३१ः खुला प्रवर्ग(कमलेश यादव, भाजप), नवीन प्रभाग क्रमांक : ३३, नवीन आरक्षण :महिला, नवीन प्रभाग रचना : महात्मा गांधी रोड, न्यू लिंक जंक्शन, वाडीलाल गोसालिया रोड, एकता नगर, गणेश नगर, ओल्ड लिंक रोड
- नवीन प्रभाग ३२ : (कमलेश यादव, भाजप), नवीन आरक्षण : खुला, नवीन प्रभाग रचना : आझाद रोड, डिपी रोड, लालजी कॉम्प्लेक्स, साईधाम कॉम्प्लेक्स, शंकरवाडी