श्रीलंकेमध्ये सुरू असलेला तणाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. महागाई आणि उपासमारीने बेहाल झालेल्या नागरिकांनी आपला संताप पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. संतप्त जमावाने शनिवारी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्याच निवासस्थानाला वेढा घालत त्यावर ताबा मिळवला. त्यामुळे श्रीलंकेतील राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला असून, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे. तसेच राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
पंतप्रधानांनी दिला राजीनामा
श्रीलंकेत गेल्या काही महिन्यांत हे दुस-यांदा यादवी युद्ध झाले आहे. शनिवारी संतप्त नागरिकांनी थेट राष्ट्रपती राजपक्षे यांच्या घरावरच ताबा मिळवला. त्यामुळे तणाव वाढला आहे. गेल्यावेळी झालेल्या बंडानंतर पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतलेल्या रानिल विक्रमसिंघे यांनी आता राजीनामा दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे. त्यानंतर विक्रमसिंघे यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
राष्ट्रपतींनीही घेतला निर्णय
शनिवारी नागरिकांनी घराचा ताबा घेतल्यानंतर राष्ट्रपती राजपक्षे यांनी अज्ञात स्थळी पलायन केले होते. त्यानंतर त्यांनीही आता तात्काळ राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतेक सर्वच पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपची आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा याला सहमती दिली होती. संसदेचे अधिवेशन बोलावून सर्वपक्षीय सरकार स्थापन व्हावे आणि त्यानंतर हंगामी अध्यक्षाची नियुक्ती करण्यात यावी, असे सर्वपक्षीय बैठकीत ठरवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community