मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न, एकनाथ शिंदेंच्या ४ पिढ्यांनी घेतलं एकत्र विठुरायाचं दर्शन

191

महाराष्ट्र राज्याच्या प्रथेप्रमाणे रविवारी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही त्यांची पहिली महापूजा होती. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.

विठुरायाच्या चरणी शिंदेंचं साकडं

त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, व्यावसायिक, उद्योजक यांच्यासह समाजातील सर्व घटकांना सुख समृध्दी लाभू दे, राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे, कोविडचे संकट कायम स्वरुपी जाऊ दे असे साकडे आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे वेळी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

4 पिढ्यांनी एकत्र घेतलं विठुरायाचं दर्शन

4 पिढ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदेंनी विठुरायाचं दर्शन घेतले. याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, हे भाग्य सर्वांनाच मिळावं. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंचे वडील संभाजी शिंदे, स्वत: एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदेंसह त्यांचा मुलगा आणि संभाजी शिंदेंचा पणतू अशा 4 पिढ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 4 पिढ्यांनी दर्शन घेतलेले हे पहिले मुख्यमंत्री असावेत.

काय म्हणाले शिंदे

यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, आजचा दिवस आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा, महत्वाचा दिवस आहे. पांडुरंगाची कृपा, आई वडीलांची पुण्याई यांच्या मुळे आज महाराष्ट्रारातील बारा कोटी जनतेच्या वतीने आपल्याला पूजा करण्याची संधी मिळाली. लाखो वारकरी दरवर्षी पायी पंढरीची वारी करत असतात. दोन वर्षे कोरोनामुळे वारकरी या वारीत सहभागी होऊ शकले नव्हते परंतु यंदा दहा लाखाहून अधिक वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. पुढे शिंदे असेही म्हणाले की, उशीरा का होईना राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी जास्त पाऊस पडत आहे परंतु कुठेही जीवीतहानी होऊ नये यासाठी शासन काळजी घेत आहे. बळीराजा पावसामुळे सुखावतोय. तथापी यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत यासाठी राज्य सरकार कटिबद्द राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी जनतेला दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.