काशी, तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करणार! मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा 

120
जे आजपर्यंत झाले नाही ते आता हे सरकार करणार आहे. पंढरपुरात हजारो, लाखो भक्तगण येत असतात, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणच्या विकासासाठी विशेष आराखडा सरकार तयार करत आहेत. काशी, तिरुपती अशा देवस्थानांच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. त्याप्रकारच्या सूचना आम्ही दिल्या आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पंढरपुरात आषाढीची पूजा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याला संबोधित केले.
पंढरपूरचे देवस्थान आणि परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जेवढा निधी लागेल तो निधी नगरविकास खात्यातून दिला जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मी जास्त बोलत नाही, काम जास्त करतो! 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकशाहीत बहुमताला महत्व असते. आमच्याकडे बहुमतापेक्षा अधिक आमदारांची संख्या आहे. त्यामुळे ११ जुलै रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. तिथे आमच्या बाजूने निर्णय होईल कारण आमची बाजू कायद्याची बाजी आहे. तरीही समोरचे लोक वारंवार न्यायालयात जात आहेत, न्यायालयही कंटाळले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मी कधी कुणावर टीका करत नाही, मी जास्त बोलत नाही आणि काम जास्त करतो. मी दिल्लीवरून आलो तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक उभे होते, हे प्रेम विकतचे कुणाला मिळत नाही. भाजपाने जेव्हा एकनाथ शिंदे याला मुख्यमंत्री केले तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार झाले. सभागृहात बाळासाहेबांचे विचार आम्हाला उघडपणे मांडता येत नव्हते, आमच्या ५० आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते. जड अंतकरणाने आम्ही ही भूमिका घेतली, आज जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आमची भूमिका सर्वसामान्यांची आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.