१५ दिवस ऑपेरेशन मोडमध्ये आहे, सुरुवातीचे ३ दिवस एकही मिनिट झोपलो नव्हतो, कारण माझ्यावर ५० आमदारांनी विश्वास ठेवला आहे. आमदारांचे भवितव्य माझ्यावर होते, प्रसंग बाका होता, लढाई मोठी होती, कारण एकीकडे बलाढ्य पक्ष दोन्ही काँग्रेस होते, मोठमोठे नेते होते, दुसरीकडे बाळासाहेब आणि दिघेसाहेबांचा साधा कार्यकर्ता होता. हा इतिहास आहे. ५० आमदारांनी सामान्य व्यक्तीवर विश्वास ठेवणे सोपे नव्हते. या घटनेची जगातील ३३ देशांनी दखल घेतली आहे. विचारांची लढाई लढत आहे. आज मी मुख्यमंत्री केवळ आनंद दिघे यांच्या कृपेमुळे आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झालो आहे. प्रसिद्धीपासून अलिप्त राहून त्यांनी शिवसेना मोठी केली. शाखा हेच माझे घर असे दिघे यांनी मानले होते. त्यांनी दाखवलेला आदर्श, काम आजही विसरू शकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्याच्या विकासातून टिकेला उत्तर देणार!
आम्हाला कोणते पद हवे होते म्हणून आम्ही ही भूमिका घेतली नाही, आम्ही सत्ता सोडून आलो आहोत. बाळासाहेबांचे हिंदुत्व म्हणजे इतर धर्माचा आदर करणे हेच आहे. आमच्यावर किती टीका झाली, उपमा दिल्या गेल्या. कामाख्या देवीला किती बळी दिले, असे म्हटले गेले. शेवटी देवीने काय केले हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही राज्याच्या विकासातून टिकेला उत्तर देणार आहे. जेव्हा आमदारांचे नुकसान होणार अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा त्याची सगळी जबाबदारी मी स्वतः घेईन. तुमच्यावर आच येऊ देणार नाही. वेळ पडली तर कुठलाही टोकाचा निर्णय एकनाथ शिंदे घेईल, असा शब्द दिला होता, म्हणून आमदार जे वाहन मिळेल त्याने ते गुवाहाटीला आले, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
५० आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते
मी कधी कुणावर टीका करत नाही, मी जास्त बोलत नाही, काम मात्र अधिक करतो. मी दिल्लीवरून आलो तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक उभे होते, हे प्रेम विकतचे कुणाला मिळत नाही. भाजपाने जेव्हा एकनाथ शिंदे याला मुख्यमंत्री केले तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार झाले. सभागृहात बाळासाहेबांचे विचार आम्हाला उघडपणे मांडता येत नव्हते, आमच्या ५० आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते. जड अंत:करणाने आम्ही ही भूमिका घेतली, आज जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आमची भूमिका सर्वसामान्यांची आहे, हे दिसत आहे.
Join Our WhatsApp Community