येणारा आठवडाही पावसाचा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

164
गेल्या आठवड्यात धूमाकुळ घालणारा पाऊस यंदाच्या आठवड्यातही कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भात सक्रीय होणार आहे. रविवारी विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीतील एक-दोन ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट जारी केलेल्या भागांत ६४.५ मिमी आणि २०४.४ मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही जोरदार पाऊस 

३ जुलैपासून सलग पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टीसह वरुणराजाने थैमान घातले होते. कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्यातील बहुतांश भागांत २०० मिमीहून अधिक पाऊस झाल्याने बहुतांश नद्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होऊ लागला आणि जनजीवन पूर्वपदावर आले. यंदाच्या आठवड्यात मात्र कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाची दमदार हजेरी लागेल. कोकणात गुरुवारपर्यंत तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांत गुरुवारपर्यंत पावसाचा पुन्हा धुमाकूळ राहील. गुरुवारपर्यंत या भागांना अतिवृष्टीसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात कुठे होणार अतिवृष्टी?

रविवारपासून चंद्रपूर, गडचिरोलीला अतिवृष्टीसाठी दिलेला रेड अलर्ट मंगळवारपर्यंत कायम राहील. नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशीमध्येही रविवार-सोमवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्टच्या तुलनेत ऑरेंज अलर्ट जाहीर केलेल्या जिल्ह्यांत पाऊस कमी होतो. रविवारी अकोला- अमरावतीत मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट राहील. मंगळवारी अकोला, बुलडाण्यात एक-दोन ठिकाणी अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट राहील. बुधवारनंतर गडचिरोली आणि चंद्रपुरात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. बुधवारी दोन्ही जिल्ह्यांना अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट राहील. विदर्भातील इतर जिल्ह्यांत मेघगर्जसनेह विजांचा कडकडाट राहील. औरंगाबाद आणि जालन्यात मंगळवारी-बुधवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट राहील. यंदाच्या आठवड्यात सांगली, सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद वगळता इतरत्र भागांत अधूनमधून पावसाची रिपरिप दिसून येईल. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत आठवड्याच्या सुरुवातीला पावसासाठी येलो अलर्ट राहील.
  • रविवारी अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जाहीर झालेले जिल्हे  – गडचिरोली आणि चंद्रपूर
  • रविवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर झालेले जिल्हे – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
  • सोमवारी अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जाहीर झालेले जिल्हे – पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.