पायी वारी करून आषाढी एकादशीला विठूरायाचरणी नतमस्तक होणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. पुढच्या वर्षी आषाढी एकादशी ११ दिवस लवकर येणार असल्याने, पेरणीची कामे आटोपल्यानंतर भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही.
१० वर्षांत आषाढी एकादशी येणार कधी?
याविषयी पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले की, पुढच्यावर्षी गुरुवार, २९ जून रोजी आषाढी एकादशी येत आहे. त्याच दिवशी बकरी ईदही असेल. मात्र, सन २०२३ मध्ये श्रावण अधिकमास असल्याने २०२४ मध्ये आषाढी एकादशी उशिरा, म्हणजे बुधवार १७ जुलैला येणार आहे. सोमण यांनी पुढील काही वर्षांतील आषाढी एकादशीचे दिवसही सांगितले. त्यानुसार २०२५ मध्ये ६ जुलै, २०२६ साली २५ जुलै, २०२७ मध्ये १४ जुलै, २०२८ मध्ये २ जुलै, २०२९ मध्ये २१ जुलै, २०३० मध्ये ११ जुलै, २०३१ मध्ये १ जुलै आणि २०३२ मध्ये १९ जुलै रोजी आषाढी एकादशी येईल.
(हेही वाचा औरंगाबाद नामांतराच्या निर्णयाची आम्हाला पूर्वकल्पना नव्हती! शरद पवारांचा ठाकरे सरकारबाबत गौप्यस्फोट )
विठ्ठलाच्या नामघोषात पायी दिंडीमध्ये सहभागी वारकरी
दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीनिमित्त अनेक वारकरी पंढरीच्या वारीला जात असतात. ही वारी म्हणजे वारकऱ्यांची आणि विठ्ठलाची भेट असते. महाराष्ट्रासह राज्याबाहेरील वारकरी विठ्ठलाच्या नामघोषात पायी दिंडीमध्ये सहभागी होतात. पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केले जाते. विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वदूरहून पालख्या पंढरपुरात येतात. पैठणहून एकनाथ महाराजांची पालखी, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराज, देहूतून तुकाराम महाराज, तर आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला येत असते.
Join Our WhatsApp Community