राज्यात गेल्या २४ तासांत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची खुशखबर आरोग्य विभागाने दिली. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात दर दिवसाला ८ किंवा ७ मृत्यूंची नोंद होत होती. रविवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
कोरोनाबाधितांचे प्रमाण ९.७२ टक्क्यांवर
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अंशतः वाढत आहे. आता हे प्रमाण ९७.९२ टक्क्यांवर नोंदवले जात आहे. रविवारी राज्यात नव्या रुग्णांच्या नोंदीत २ हजार ५९१ कोरोना रुग्णांची भर पडली. त्या तुलनेत २ हजार ८९४ रुग्णांना यशस्वी कोरोना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण ९.७२ टक्क्यांवर नोंदवले जात असून, मृत्यूदराचा टक्का १.८४ टक्क्यांवर कायम आहे.
३ हजार ७५३ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत
राज्यात आता १८ हजार ३६९ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार दिले जात आहेत. कोरोनातून यशस्वी उपचार घेत डिस्चार्ज रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मुंबईतही आता केवळ ३ हजार ७५३ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत. पुण्यात मात्र ६ हजार ४७० कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत. ठाण्यात २ हजार २५९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.