‘आईचे दुःख मला बघवत नाही, जन्म देणाऱ्या आईसोबत मी गुन्हा केला आहे, आय लव्ह पापा’, या आशयाची चिठ्ठी लिहून २२ वर्षांच्या मुलाने आईची गळा कापून हत्या केली. त्यानंतर स्वतः रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुलुंड पश्चिमेत शनिवारी रात्री उघडकीस आली आहे. या घटनेत मुलगा बचावला असून त्याची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून हा प्रकार संपत्तीच्या वादातून घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
धारदार शस्त्राने वार करण्यात आले
छाया पांचाळ (५०) असे आईचे नाव होते, तर जयदीप पांचाळ (२२) असे जखमी मुलाचे नाव आहे. मुलुंड पश्चिम येथील एन.एस.रोड वरील वर्धमान नगर येथील एका इमारतीत छाया पांचाळ, मुलगा जयदीप आणि पती हे सोबत राहत होते. शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास छाया पांचाळ रक्ताच्या थारोळ्यात घरात पोलिसांना आल्या, त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते, पोलिसांनी छाया यांना उपचारासाठी अग्रवाल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वडिलोपार्जित संपत्तीवरून तणावात होते
दरम्यान जयदीप याने मुलुंड रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ वरून ट्रेनच्या समोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात तो गंभीर जखमी झाला, रेल्वे पोलिसांनी इतर प्रवाशांच्या मदतीने अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. जयदीपजवळ वडिलांचा मोबाईल क्रमांक मिळाला, रेल्वे पोलिसांनी त्या क्रमांकावर कॉल करून कळविले. दरम्यान मुलुंड पोलिसांना पांचाळ यांच्या घरात मिळालेल्या चिठ्ठीत गुजरातीमध्ये ‘आईचे दुःख मला बघवत नाही, जन्म देणाऱ्या आईसोबत मी गुन्हा केला आहे, आय लव्ह पापा’, या आशयाची चिठ्ठी मिळाली. पोलिसांनी जयदीपच्या अक्षराची खात्री करून वडिलांचा जबाब नोंदवला असता मुलगा जयदीप आणि पत्नी छाया हे दोघे वडिलोपार्जित संपत्तीवरून तणावात होते, असे त्यांनी जबाबात म्हटले आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचे खरे कारण काय आहे, हे जयदीप हा शुद्धीवर आल्यावर त्याच्या चौकशीत समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community