राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर करण्याच्या पवारांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. पवारांची एक भूमिका आहे. आमच्याशी चर्चा झाली नाही. समन्वय नव्हता एवढेच पवार म्हणाले. निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
महाराष्ट्रात ज्याप्रकारे एक बेकायदेशीर सरकार करण्याचा प्रयत्न झाला ते पाहता हे सरकार लादले आहे. त्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर करण्यात आला. त्याविरुद्ध शिवसेना महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. या देशात लोकशाही आहे की नाही? या देशातील कारभार राज्यघटनेनुसार चालतो की नाही की तिथेही दाबदबाव आहे. याचा फैसला सोमवारी होणार आहे. संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाकडे एका अपेक्षेने पाहतो आहे. यावर शेवटी जे काही निर्णय घ्यायचा तो सर्वोच्च न्यायालय घेईल, पण न्यायालय आमच्या खिशात आहे. आमच्याच बाजूने निर्णय लागेल, अशी वक्तव्य काही लोकांकडून केली जात आहेत. त्यामुळे शंका निर्माण झाल्या आहेत, असे राऊत म्हणाले.
( हेही वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘डिटेक्टीव्ह देवेंद्र’; ‘सामना’तून फडणवीस यांच्यावर टीका )
संपूर्ण देशातून विरोधी पक्ष संपवण्याचे षडयंत्र
गोव्यातही आमदार पळवले जात आहेत. त्यावरही राऊतांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संपूर्ण देशात विरोधी पक्ष संपवण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्यामुळेच लोकशाहीला धोका आहे. राज्याबाबतचा जो निर्णय होईल, तो संसदीय लोकशाहीसाठी आशादायी असेल, असे ते म्हणाले.
…तर मोठे उपकार होतील
आदित्य ठाकरे मुंबईत निष्ठा यात्रा काढत आहेत. त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ग्रासरुटची जनता फक्त शिवसेनेसोबत आहे. असली नकली आणि गटाचा प्रभाव राज्यातील लोकांवर नाही. मी रविवारी नाशिकमध्ये होतो. लोक हजारोंच्या संख्येने मला भेटायला आले होते. लोकांनी बाळासाहेबांचे नाव वापरुन आपल्या भाक-या भाजू नये, मोठे उपकार होतील, असेही राऊत यावेळी म्हणाले.