एका महिन्यात मुंबईतील ७६ वीज ग्राहकांची फसवणूक; ‘हा’ मेसेज तुम्हालाही आलाय का?

145
‘प्रिय ग्राहक तुमचे मागील महिन्याच्या बिलाची रक्कम सिस्टममध्ये अपडेट झालेली नसल्यामुळे तुमचा वीज पुरवठा आज रात्री ९:३० वाजता वीज कार्यालयातून खंडित करण्यात येणार आहे, कृपया तत्काळ आपल्या वीजपुरवठा अधिकारी यांच्याशी ९१५१****** या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद, या आशयाचे बोगस मेसेज पाठवून सायबर गुन्हेगारांकडून वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. मागील एका महिन्यात मुंबईतील ७६ जणांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
सायबर गुन्हेगारांकडून एकट्या मुंबई शहरात ७ जुन ते ५ जुलै २०२२ या एका महिन्याच्या कालावधीत वीजबिलाच्या नावाखाली ७६ वीज ग्राहकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या ७६ जणांकडून सायबर गुन्हेगारांनी अंदाजे दीड कोटी रुपये उकळले आहेत. मुंबईतील ४० पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणी एका महिन्यात गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये डॉक्टर, इंजिनियर, सरकारी अधिकारी, नौदल अधिकारी, व्यापारी, विकासक, त्याचबरोबर नोकरदार वर्गाचा समावेश आहे. तसेच, फसवणूक झालेल्यांमध्ये एक तृतीयांश संख्या जेष्ठ नागरिकांची आहे.

या पद्धतीने होते  फसवणूक….

वीज ग्राहकाला मेसेज आल्यानंतर त्या मेसेजमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केल्यानंतर समोरची व्यक्ती ग्राहकाला त्याच्या बिलाची सर्व माहिती आणि ग्राहक क्रमांक घेतो, आम्ही बिल भरले असल्याचे ग्राहकाने सांगितले असता, सिस्टीममध्ये अपडेट न झाल्यामुळे ते दिसून येत नाही, असे सांगण्यात येते. त्यानंतर ग्राहकाला ‘क्विक सपोर्ट अॅप्लिकेशन’ डाउनलोड करण्यास सांगण्यात येते. अॅप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर, ग्राहकाला एक लिंक पाठवून त्याच्यावर १० किंवा २० रुपये पाठवण्यास सांगितले जाते. ग्राहकाने या लिंक वर पैसे पाठवताच काही वेळाने त्या ग्राहकाच्या बँक खात्यातून दुसऱ्या खात्यावर मोठी रक्कम ट्रान्सफर केली जाते. ग्राहकाला बँकेकडून मेसेज आल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते.
अंधेरी येथील एका ५७ वर्षांच्या नागरिकाच्या खात्यावरून तब्बल ११ लाख ९४ हजार रुपये सायबर गुन्हेगारांनी दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर केले. तसेच, ट्राॅम्बे येथील ६० वर्षांच्या जेष्ठ नागरिकांच्या खात्यावरून साडे सहा लाख रुपये दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले. सांताक्रूझ येथील जेष्ठ नागरिकांच्या खात्यावरून मोठी रक्कम काढली गेली आहे. मागील एका महिन्यात सायबर गुन्हेगारांनी  वीज बिलाचे खोटे मेसेज पाठवून ७६ वीज ग्राहकांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
जामताडा कनेक्शन…
सायबर गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून ओळखले  जाणारे झारखंड राज्यातील जामताडा हे खेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईसह राज्यभरातील वीज ग्राहकांना येणारे बोगस मेसेज जामताडा येथून येत असल्याचे, मुंबई पोलिसांच्या एका कारवाईत समोर आले आहे.  मलबार हिल पोलिसांनी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून एकाला अटक केली असता, त्याचे जामताडा कनेक्शन समोर आले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने फसवणुकीच्या रकमेतून मोबाईल खरेदी केले होते. ही व्यक्ती झारखंड येथील जामताडा या खेड्यातील असून, तिथून हे वीज बिलाचे बोगस मेसेज पाठवून फसवणूक करण्यात येत असल्याचे त्याने कबूल केले आहे.

‘या’ मेसेजला बळी पडू नका 

 वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे मेसेज ग्राहकाला वीज कंपन्यांकडून पाठवले जात नाहीत, तसेच कुठल्याही अधिकारी-यांचे मोबाईल क्रमांक शेअर्स केले जात नसल्यामुळे हे मेसेज बोगस असून वीज पुरवठा अथवा वीजबिल संदर्भात ग्राहकांची काही तक्रार असल्यास ग्राहकांनी आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी थेट कार्यालयात येऊन चौकशी करावी, असे आवाहन वीज कंपन्यांकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.