कांदळवनात भराव टाकून ७० झोपड्या बांधून त्या झोपड्या भाडेतत्वावर देणाऱ्या दोन कुटुंबांविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमुदलता सिंग, महेश सिंग, प्रतिमा सिंग आणि दिनेश सिंग असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
६० ते ७० झोपड्या बांधल्या आहेत
मालाड पश्चिमेतील मार्वे जेट्टी रोड, कोको गार्डन या ठिकाणी कांदळवन असलेल्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून मुरूम माती टाकून ६० ते ७० झोपड्या बांधण्यात आलेल्या असून या झोपड्या भाडेतत्वावर देण्यात आलेल्या आहेत, अशी तक्रार प्रभाग क्रमांक ३२ नगरसेविका गीता भंडारी यांनी बोरिवली येथील तलाठी कार्यालयात लेखी स्वरूपात केली होती. या तक्रारीच्या आधारे तलाठी कार्यालयातील मंडळ अधिकारी सतीश भागवत यांनी आपल्या पथकासह सदर ठिकाणची पाहणी केली असता ज्या जमिनीवर अनधिकृत झोपड्या बांधण्यात आलेल्या आहेत, ती जमीन सरकारी असून १७.४०० चौरस मीटर जागेवर मुरूम मातीचा भराव करून त्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले व त्याच्यावर ६० ते ७० कच्च्या झोपड्या उभारण्यात आलेल्या होत्या.
(हेही वाचा शिवसेनेचे खासदारही आमदारांच्या वाटेवर? बैठकीला सात खासदारांची दांडी)
२ ते ३ हजार रुपये भाडे घेत
या झोपड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे चौकशी करण्यात आली असता त्यांच्याकडे झोपड्याचे कुठलेही कागदपत्रे मिळाले नसून या झोपड्यांमध्ये येथील रहिवासी भाडेतत्वावर राहत असून ते दरमहा कुमुदलता सिंग, महेश सिंग, प्रतिमा सिंग आणि दिनेश सिंग यांना २ ते ३ हजार रुपये भाडे देत असल्याचे तेथील रहिवाशी यांनी सांगितले. मंडळ अधिकारी यांनी पंचासमक्ष जमिनीचा पंचनामा करून मालवणी पोलीस ठाण्यात पुरावे, जमिनीच्या सातबाराची प्रत देऊन कुमुदलता सिंग, महेश सिंग, प्रतिमा सिंग आणि दिनेश सिंग यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. मालवणी पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायदा तसेच मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community